वर्धा: नदी म्हणजे जीवनदायीनी. नदीकाठीच संस्कृती विकसित झाली. बहरली. मात्र आता औद्योगिकरणाचे संकट या नद्यावरच कोसळले. त्या अधिकाधिक प्रदूषित होत आहे. त्याची जाण ठेवून त्या शुद्ध करण्याचा संकल्प शासन पातळीवर होत असल्याचे दिसून येते. तसेच स्वयंसेवी संस्था पण या कार्यात हिरीरीने पुढे येत आहे.
असाच प्रयत्न नदी मित्र व संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद करीत आहे. त्या संदर्भात उपक्रम सूरू झाला आहे. नदी संवाद कार्यक्रमास धाम नदी पात्राकाठी बैठक झाली. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, धाम, नाग, यशोदा, पेंच या नद्या विदर्भाच्या जीवनरेखा म्हटल्या जातात. कृषी, पेयजल, उद्योग यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या या नद्या विदर्भाचा सांस्कृतिक इतिहासाच्या साक्ष आहेत. मात्र अवैध रेती उपसा, सांडपाणी, कारखान्याचा मलबा, अत्याधिक उपसा, जंगल कटाई यामुळे नद्या संकटात सापडल्याची भिती व्यक्त होते. उद्योगातून निघणारी राख नद्या प्रदूषित होण्याचे मुख्य कारण ठरत असल्याचे प्रा. ओम प्रकाश भारती म्हणतात. पाण्याची गुणवत्ता घसरत चालली. शेतीत वापरल्या जाणारे रसायन पाण्यासोबत वाहत नदीत मिसळते. त्यामुळे पाणी प्रवाह विषारी होतो. पाऊस कमी पडल्याने पैनगंगा नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. गोसीखुर्द सारख्या धरणामुळे नद्याचे नैसर्गिक प्रवाह संकोचले. त्यामुळे मासे व अन्य जलजीव तसेच जैव वैवीध्य संकटात अडकले.
हे संकट दूर करण्यासाठी अवैध रेती उपसा व कचरा टाकण्याचा प्रकार रोखण्यासोबतच जल संधारण, वनीकरण व स्थायी स्वरूपातील जल व्यवस्थापन अंमलात येण्याची गरज व्यक्त झाली. त्या अनुषंगाने आयोजक सांस्कृतिक परिषदेने संकल्प सोडला. त्याद्वारे विदर्भातील नद्या सरक्षित करण्याचा प्रयत्न होईल. प्रथम नदीशी जुळलेल्या कथा, गाणी, मिथके, ऐतिहासीक संदर्भ व मौखिक परंपरा यांचे संकलन होणार. नदीकाठी वसलेले जनजीवन, तीर्थस्थळ, सांस्कृतिक केंद्र, सण याचा अभ्यास होईल. भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून नदीचा डेटा, डिजिटल अरकाईव्ह याचे संग्रहालय स्थापन करण्याची योजना आहे. त्याद्वारे नदीचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीसाठी सुरक्षित राहणार. सांस्कृतिक परिषद व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. सतीश पावडे यांच्या योगदानातून हे नियोजन साध्य केल्या जाणार आहे. तसेच विद्यार्थी विशाल इंगोले, वैभव निखाडे, रत्नेश साहू, स्वेच्छा, अमिषा, रुपम, राहूल यादव व अन्य मान्यवर सहयोग देतील. या कार्यात शासन, स्थानिक मंडळी, पर्यावरणप्रेमी संस्था यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भाचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचा हा सामूहिक प्रयत्न असल्याचे आयोजक म्हणतात.