वर्धा: सध्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची जोरात चर्चा सूरू आहे. यावर्षीपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने अनेकांचा गोंधळ उडत असल्याचे म्हटल्या जाते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन गोंधळात पडल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसंगी या संदर्भात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. शिक्षण संचालनालयाने प्रवेश बाबत टिप्स देणारी पुस्तिका नव्याने काढली. प्रवेशातील काही प्रश्न व त्याची अशी उत्तरे.

प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय ?

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे.

कोण अर्ज करू शकतो ?

इयत्ता दहावीची कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जे राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात.

नोंदणी कशी करावी ?

यासाठी महाएफवायजेसीऍडमिशन्स या संकेतस्थळास भेट द्या. स्टुडंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा, माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. एसएमएस  माध्यमातून लॉगिन आयडी मिळणार.

किती विद्यालयाची पसंती देता येईल ?

विद्यार्थी किमान एक व अधिकाधिक  दहा उच्च माध्यमिक विद्यालयाचे पसंतीक्रम नोंदवू शकतो.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे ?

दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला तसेच आवश्यक्तेनुसार आरक्षण व विशेष प्रवर्गाची प्रमाणपत्रे.

इतर मंडळाचा विद्यार्थी असल्यास ?

अश्यांनी श्रेणी गुणांचे रूपांतरण गुणांमध्ये करायचे आणि ते गुण आपल्या अर्जात भरावे. आपले इयत्ता दहावीचे हॉलतिकीट व गुणपत्रिका अपलोड करीत मार्गदर्शन केंद्रात पडताळणी करावी.

दहावीत एक दोन विषयात नापास असल्यास ?

नापास असल्यास पण अर्ज करता येतो. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी अंतर्गत अर्ज करता येतो.

कोटा प्रकार कोणते ?

इन हाऊस कोटा १० टक्के व व्यवस्थापन कोटा ५ टक्के. अल्पसंख्यांक कोटा मायनॉरिटी महाविद्यालयात ५० टक्क्यापर्यंत.

प्रवेशासाठी किती फेऱ्या ?

चार नियमित फेऱ्या व त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी.

प्रथम पसंतीचे विद्यालय मिळुनही प्रवेश घेतला नाही तर?

जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे विद्यालय मिळुनही प्रवेश घेतला नाही तर संबंधित विद्यार्थी पुढील फेरीसाठी अपात्र ठरेल. इतर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतील.

एकापेक्षा अधिक फेऱ्यात सहभागी होता येते कां ?

होय. पण प्रत्येक फेरीपूर्वी पोर्टलवर संमती देणे आवश्यक आहे.

विद्यालय प्राधान्यक्रम बदलता येतो कां ?

होय. प्रत्येक फेरीपूर्वी तुमचा ऑप्शन फॉर्म पार्ट – २ अद्यावत करता येतो.

यादीत नाव आल्यावर लगेच प्रवेश निश्चित होतो कां ?

नाही. विहित कालावधीत यासाठी प्रोसिड फॉर ऍडमिशन यावर क्लिक करा. कागदपत्रे अपलोड करा. संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर व संबंधित विद्यालयाने प्रवेश निश्चित केल्यावरच प्रवेश निश्चित होतो.

शून्य फेरी म्हणजे काय ?

शून्य फेरी म्हणजे संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोटा यातील प्रवेशाचे कामकाज. हे काम नियमित फेरी क्रमांक एक सोबत चालणार आहे.

सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे काय ?

नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ज्या फेरीत विद्यार्थ्यांच्या फक्त दहावीच्या गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय वाटप करण्याची फेरी होय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर माहिती पुस्तिकेत शुल्क व अन्य तपशील पण देण्यात आले आहे. ऑनलाईन प्रवेश प्रणाली ही प्रथमच लागू झाल्याने विविध बाबी समजून घेणे आवश्यक ठरत आहे.