तुषार धारकर, लोकसत्ता 

नागपूर : चाकडोह (बाजारगाव) येथील सोलार एक्सप्लोझिव्ह कारखान्यात गेल्या रविवारी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांना जीव गमवावा लागला होता. सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि अप्रशिक्षित कामगारांची नेमणूक यामुळे स्फोट झाल्याचा आरोप होत असताना याप्रकरणी अतिशय संथ गतीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध शासकीय यंत्रणा चौकशी करत असल्या तरी आठवडा उलटल्यानंतरही याबाबत कुणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही. चौकशीच्या नावावर केवळ खानापूर्ती केली जात असल्याने कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे.

स्फोटानंतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ एक संदेश जारी करून बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले. घटनेच्या तपासासाठी पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), औद्योगिक सुरक्षा संचालनाय यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या संस्थांचे अधिकारी तपासाबाबत एकही शब्द बोलायला तयार नाही. तपासात काय आढळून आले? दोषी कोण आहेत? नियमांचे पालन झाले आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तपास कधीपर्यंत पूर्ण होणार? तो जनतेसमोर येणार काय? दोषींवर काय कारवाई होणार? याबाबतही यंत्रणांद्वारे कमालीची गुप्तता पाळली जात आहे. याबाबत वारंवार संपर्क करूनही कारखान्यातील अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा >>> माणगाव मध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त; तीन जणांना अटक ,सुत्रधाराच्या शोधासाठी चार पथके तैनात

राज्यकर्त्यांचेही मौन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र, चौकशीबाबत त्यांनी कोणतेही विधान केलेले नाही. नेतेही यावर मौन बाळगून आहेत. कारखान्याच्या मालकाचे राज्यकर्त्यांसोबत जवळचे संबंध असल्यामुळे या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा त्यामुळे रंगली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्फोटकांच्या तपासणीवर भर

सर्व तपास यंत्रणाच्या चौकशीचा भर हा स्फोटकांच्या तपासणीवर आहे. मात्र, स्फोटके हाताळण्यासाठी अप्रशिक्षित कामगार नेमले होते का, याकडे तपास यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कुशल कामगारांची नेमणूक करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे नियमानुसार आवश्यक आहे. मात्र सध्यातरी तपास यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून त्यामुळे अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे.