वर्धा : नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीने घायाळ शेतकरी आता नव्या संकटात सापडला आहे. सध्या रब्बी हंगामात तूर मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. हे आंतरपीक शेतकऱ्यास थोडे अधिकचे पैसे देणारे असते. पण आता या पिकावर संकटाचे मळभ दाटून आले आहे. गेल्या तीन दिवसांत चांगलेच धुके दाटून आले. याला धुयार म्हणून ग्रामीण भागात ओळखल्या जाते. सर्वत्र धुके साचल्याने आभाळ दिसेनासे झाले. अंधार दाटला. पण हा अंधार उत्पादनावर आल्याने शेतकरी रडवेला झाला आहे.

उत्पादन निम्म्यावर

धुक्यामुळे तुरीची पाने गळून पडतात. शेंगा भरत नाही. दाणे मोठे होत नाही. परिणामी पिकास फटका बसतो. उत्पादन निम्म्यावर येते. साधारणपणे एका एकरात ६ ते ७ क्विंटल उत्पादन अपेक्षित असते. पण आता ते ३ ते ४ पर्यंत घसरणार. सोनेगाव येथील शेतकरी सतीश दाणी सांगतात की, देवळी पंचक्रोशीत धुयार साचले. तीन दिवस हे गडद धुके राहिल्याने तूरपिकास मोठा फटका बसला. मला आता अर्धेच पीक मिळणार. हे नैसर्गिक संकट शेतकऱ्याचे कंबरडेच मोडणार.

हेही वाचा…वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…

आधी सोयाबीन, कापूस अन् आता…

यावर्षी अतिवृष्टी झाल्याने बहुतांश पीक वाहून गेले किंवा शेतातच सडल्याची ओरड झाली होती. १० जुलै ते सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस झाला होता. सर्वच आठही तालुके पावसाने धुवून निघाले होते. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकांची हानी झाली. उत्पादनात चांगलीच घट झाली. ५० टक्के पिकांना पावसाचा व नंतर काही प्रमाणात किडीचा फटका बसला. आता उरले सुरले उत्पादन भाव मिळत नसल्याने कवडीमोल झाल्याचे शेतकरी सांगतात.

हेही वाचा…नोंदणी विवाहाकडे नव्या पिढीचा कल, रशियन युवक म्हणतो हेच बरं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाफेड खरेदीला मर्यादा

नाफेडमार्फत खरेदी सुरू आहे. पण खरेदी मर्यादा घालून देण्यात आली आहे. एका शेतकऱ्याकडून हेक्टरी ११ क्विंटल खरेदी दोन हेक्टरच्या मर्यादेत नाफेड कडून केल्या जात आहे. २५, ३० क्विंटल सोयाबीन विकायला नेणाऱ्या शेतकऱ्यास मग उर्वरित सोयाबीन बेभाव, पडेल किंमतीत विकण्याची आपत्ती आहे. सोयाबीनला ४८०० रुपये क्विंटलचा हमीभाव आहे. पण नाफेडने मर्यादेत खरेदी केल्यानंतर उरलेले सोयाबीन ४ हजार ते ४२०० रुपये क्विंटल या भावात तिथेच व्यापारी विकत घेतात. शेतकरी उरलेले सोयाबीन परत घरी आणत नाही, अशी आपबीती सतीश दाणी सांगतात. आता धुक्या मुळे शेतकरी बेजार झाल्याचे चित्र आहे.