गडचिरोली : नक्षल्यांना साहित्य पुरवठा करणाऱ्या समितीचा उपकमांडर चैनुराम याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ त्याचा साथीदार मेस्सो गिल्लू कवडो (५०, रा. रेखाभटाळ ता. एटापल्ली ) याला देखील अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. मेस्सो याला जारावंडी – दोड्डूर जंगल परिसरातून ताब्यात घेतले असून नक्षल्यांना शस्त्रपुरवठा करणारी साखळी तोडण्यात यंत्रणेला यश आले आहे.

मेस्सो कवडो हा नक्षलचळवळीत एरिया कमिटी मेंब होता. तो माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत असे. १४ ऑक्टोबरला अटक झालेला जहाल माओवादी चैनुराम कोरसासोबत तो काम करत होता.   मेस्सो कवडो हा एटापल्ली तालुक्यातील जारावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने गट्टा पोलीस ठाण्यातील जवान, राज्य राखीच दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी  त्याला अटक केली. त्याच्यावर राज्य शासनाने सहा लाखांचे बक्षीस ठेवले होते.

हेही वाचा >>> भोंगळेच्या ‘दांडिया’मुळे आमदार सुभाष धोटे व भोंगळे समोरासमोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेस्सो २०१७ मध्ये  नक्षल्यांच्या पुरवठा समितीमध्ये सदस्य पदावर भरती झाला व २०२३ पर्यंत कार्यरत होता. या दरम्यान त्यास एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नतीही मिळाली.  नोव्हेंबर, डिसेंबर २०१७ मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. २०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरातील चकमकीतही तो सहभागी होता. २०२१ मध्ये रामनटोला (ता.एटापल्ली) व २०२२ मध्ये दोड्डूर (ता.एटापल्ली) येथे दोन गाव पाटलाच्या खुनात त्याचा सहभाग होता. २०२१ मध्ये छत्तीसगडमधील ताडबैली (जि. कांकेर)  येथील मोबाईल टॉवर जाळपोळ प्रकरणातही तो सामील होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.