कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर बोम्मईंनी काही महाराष्ट्राला डिवचण्यासाठी काही ट्वीटही केले होते. पण, गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बोम्मई यांनी ते ट्वीट बनावट असल्याचा दावा केला होता.

बोम्मईंच्या दाव्यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने टीका करत शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं. त्याला आज ( १९ डिसेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. “आम्ही मुख्यमंत्र्यांना समोरामसोर चर्चेदरम्यान तुम्ही ट्वीट करत असून हे चुकीचं आहे, असं सांगितलं. त्यावर त्यांनी हे आमचं ट्वीट नाही सांगत नकार दिला. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे, त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का?, फडणवीसांची सभागृहातच ठाकरे गटाच्या आमदाराला विचारणा

यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोम्मईचा समाचार घेत शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “बोम्मई हा अतिशय खोटारडा माणूस आहे. मुख्यमंत्र्यांचे ट्वीट हॅक होतं आणि त्यांना १५ दिवसांनी समजतं. आम्हाला काय वेडे समजता का? अशी बिल फाडण्याचं काम कॉलेजमध्ये चालत होतं. मला लाज वाटते बोम्मईचे कपडे सरकार संभाळत आहे. पण, बोम्मईमुळे तुमचे कपडे उतरत आहेत,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

हेही वाचा : संजय राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा VIDEO ट्वीट केल्यावरून अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, “वस्तुस्थिती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बोम्मईंच्या ट्वीटरनंतर मराठी माणसांनी कानाखाळी खाल्ल्या. आमच्या मराठी माणसांच्या गाड्या फुटल्या, त्यांचा अपमान झाला. तरीही मर्द मराठे आम्ही शांत बसलो. हा बोम्मई खोटारडा आहे. दिल्लीत येऊन सांगतो माझं ट्वीटच नाही. मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. तुम्हाला काय मस्करी वाटते का? विधानसभेत सांगायाचं ते कोणत्या पक्षाने ट्वीट केलं आहे. बोम्मई चुकले तर पांघरून घालण्याचं काम करु नका. आमच्या मराठी माणसांनी मार खाल्ला आहे,” अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी शिंदे सरकारला खडसावलं आहे.