वर्धा : प्रशासनात काम करीत असतांना नित्य नवी आव्हाने अधिकाऱ्यांपुढे उभी असतात. ते झेलत परत विशिष्ट क्षेत्र निवडून त्यात उल्लेखनीय कामगिरी करण्याची बाब अपवादात्मक म्हटल्या जाते. अशीच कामगिरी वर्धा येथे जिल्हाधिकारी राहलेले व आता नांदेडचे जिल्हाधिकारी असलेले राहूल कर्डीले यांनी बजावली होती. त्यांचेच कार्य विद्यमान जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी पुढे नेले. दोघेही पुरस्काराचे मानकरी ठरले.
नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित कारंजा तालुक्याने ६ निर्देशांकापैकी ४ निर्देशांक शंभर टक्के पूर्ण केल्याने राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील ५०० तालुके यात सहभागी झाले होते. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत ६ निर्देशांकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील २७ आकांक्षित तालुक्यांनी सहभाग घेतला होता.
तालुक्यातील गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण शंभर टक्के करणे, तालुक्यातील ३० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची उच्च रक्तदाब संदर्भात शंभर टक्के तपासणी, तालुक्यातील ३० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची शंभर टक्के मधुमेह तपासणी, तालुक्यातील गर्भवती महिलांना शंभर टक्के पूरक पोषण आहाराचे वितरण, मृदा आरोग्य तपासणी कार्ड शंभर टक्के वितरण, तालुक्यातील महिला स्वयंसहायता समूहांना खेळत्या भांडवलाचे शंभर टक्के वितरण.
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आकांक्षित कारंजा तालुक्याने तालुक्यातील लक्षित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी, उच्च रक्तदाबासाठी तपासणी, गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण आणि तालुक्यातील महिला स्वयंसहायता समूहाना खेळत्या भांडवलाचे शंभर टक्के वितरण हे ४ निर्देशांक शंभर टक्के पूर्ण केले.
या अभियानात तालुक्याने संपूर्णता प्रतिज्ञाद्वारे मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्धारित वचनबद्धता ६ पैकी ४ निर्देशक संतृप्त करून यात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल जिल्हाधिकारी वान्मथी सी, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आकांक्षित तालुका कारंजाचे कृषी अधिकारी मंगेश पंधरे व आकांक्षित तालुका फेलो अपुर्व पिरके उपस्थित होते.
संपूर्णता अभियान मोहिमेत योगदान दिलेल्या तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांना पदक व प्रशस्तीपत्र तर तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाचे गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.