स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यवतमाळातील सात सायकलपटूंनी आज महापरिनिर्वान दिनी ‘माँ तुझे सलाम’ ही सायकल मोहीम सुरू केली. हे सायकलपटू १० दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारी हे तीन हजार किमीचे अंतर कापणार आहे.
भारतीय जवानांना मानवंदना देण्याकरीता व प्रदूषणमुक्त पर्यावरण, तंदुरुस्त आणि निरोगी जीवन हा संदेश घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे पथक आज मंगळवारी यवतमाळ येथून श्रीनगरला रवाना झाले. यात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपचे सदस्य डॉ. महेश मनवर, डॉ. आशीष गवरशेट्टीवार , डॉ. अतुल माईंदे, डॉ. हर्षल झोपाटे, डॉ. जया मनवर, अभिजीत राऊत, सुरेश भुसांगे यांचा समावेश आहे. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ असा तीन हजार ६६० किमीचा प्रवास सायकलद्वारे पूर्ण करणार आहे. ८ डिसेंबर रोजी श्रीनगर येथून ही सायकल यात्रा सुरू होणार आहे. जागतिक विक्रम प्रस्थापीत करण्याकरिताही नोंदणी करण्यात आली आहे.