लोहमार्ग पोलिसांची कारवाई

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरून एका चिमुकलीचे अपहरण करून गुजरात येथे नेणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिसांनी यश आले आहे. अमरावती जिल्ह्य़ातील चांदपूर रेल्वे येथील सूरज खिराडकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे आहेत. महिनाभरापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकाहून त्याने दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले होते. नागपुरातील पारडी येथील एक महिला नागपूर रेल्वेस्थानकावर मुलीसह २२ ऑक्टोबरला आली होती. ही महिला एका ओळखीच्या व्यक्तीसोबत बोलत असताना सूरजने त्या चिमुकलीला चॉकलेट घेऊन देतो म्हणून सोबत नेले. पण बराच वेळ होऊनही मुलगी परत आली नाही म्हणून आईला काळजी वाटली.

तिने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संपूर्ण रेल्वेस्थानक पिंजून काढले. सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. आरोपी सूरज मुलीला घेऊन बडनेराला गेला. काही दिवस त्याने रेल्वेस्थानकावर घालवले. नंतर पुणे, मनमाड रेल्वेस्थानकावर थांबल्यानंतर तो गुजरातमधील सोमनाथला गेला. रेल्वेस्थानकावर तो भीक मागून जगत होता. तसेच मुलीला सुद्धा भीक मागायला लावायचा. त्याच्यावर पोलिसांना संशय आला, पोलिसांनी त्याची चौकशी केली. तपासादरम्यान त्याने मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.

सोमनाथ पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. एक पथक गुजरातसाठी रवाना झाले. पथकाने सूरजला ताब्यात घेऊन नागपुरात  आणले. या मुलीला विकण्याच्या हेतून तिचे अपहरण केले, पण ग्राहक मिळाला नाही, असा दावा पोलिसांनी केला.