सुपरस्पेशालिटीत प्रत्यारोपण कधी?
उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनापासून मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबले आहे. मध्यंतरी सुपरला ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ मिळाले. त्यानंतर प्रत्यारोपणासाठी झटपट प्रयत्न झाले. परंतु. एका दानदात्याचा अपघात तर इतरही रुग्ण वा नातेवाईकांत समस्या निर्माण झाल्याने येथील प्रत्यारोपणाची समस्या सुटताना दिसत नाही.
हेही वाचा >>>गडचिरोली: भामरागड तालुक्यातील दुचाकी रुग्णवाहिकेचा फसवा प्रयोग; प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांची चमकोगिरी
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सुपरस्पेशालिटीतील मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्णांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकारानेच येथे कंत्राटी सहयोगी प्राध्यापक म्हणून एक ‘नेफ्रोलाॅजिस्ट’ रूजू झाले. या प्रक्रियेनंतर येथे चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा तीन मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची चाचपणीही झाली. या रुग्णांच्या नातेवाईकांकडून मूत्रपिंड दान देण्याची तयारी दर्शवण्यासह बऱ्याच तपासण्यासह कागदपत्रांचीही पुर्तताही केली गेली.
हेही वाचा >>>नागपूर: मूत्रपिंड प्रत्यारोपणाला अडचणींचा थांबा!
दरम्यान, नवीन ‘नेफ्रोलाॅजिस्ट’कडून करोनापासून सुपरला बंद पडलेली मूत्रपिंडाची प्रतीक्षा यादीवरही काम सुरू झाले. बघता-बघता काही दिवसांतच सात रुग्णांची नोंदही झाली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तयारी पूर्ण झाल्यावर सुपरच्या डॉक्टरांकडून पहिल्या प्रतीक्षा यादीतील रुग्णाला भ्रमणध्वनी करण्यात आला. परंतु, त्याला दान देणाऱ्याचा अपघात होऊन पायाचे हाड मोडल्याचे पुढे आले. त्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ही प्रत्यारोपणाची प्रक्रिया पुढे गेली.
दुसऱ्या प्रकरणात गडचिरोलीतील रुग्णाचा पाठपुरावा सुरू असून भंडारातील एका रुग्णासाठी मध्यंतरी मेंदूमृत रुग्णाचे अवयव उपलब्ध असल्याचे पुढे आले. परंतु, हे मूत्रपिंड उपलब्ध झालेला व्यक्ती मधुमेह असलेला असल्याने गुंतागुंतीची समस्या बघता रुग्णाने प्रत्यारोपणास नकार दिला. २०२० ते २०२१ दरम्यान मेंदूमृत रुग्णाकडून मिळालेल्या तीन मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण येथे करण्यात आले होते, हे विशेष.