बुलढाणा : लोणार म्हणजे केवळ जगविख्यात खाऱ्या पाण्याचे सरोवर नव्हे. महाकाय उल्का कोसळून तयार झालेले १६०० मीटर व्यासाचे सरोवर हीच लोणार या पौराणिक व ऐतिहासिक नगरीची ओळख नाही, तर दैत्यसूदन मंदिरदेखील या पुरातन नगरीची एक ठळक ओळख आहे. सध्या हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर ‘प्रकाशात’ आले आहे. याचे कारण येथे सुरू असलेला अनोखा, अद्भुत किरणोत्सव होय!

सध्या रोज अग्निसारख्या तळपत्या सूर्याची किरणे थेट मंदिरातील भगवान विष्णूंच्या मुकुटावर अभिषेक करीत आहे. प्राचीन काळातील भारतवर्षात विज्ञान, तंत्रज्ञान किती प्रगत होते याचा हा पुरावा आहे. स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी ११.१० ते ११.३० मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे. तसेच १९ मे पर्यंतच हा अद्भुत नजराणा दिसणार आहे. यामुळे या मंदिरात सध्या पर्यटक व अभ्यासक यांची तोबा गर्दी उसळत आहे.

हेही वाचा…काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! ‘चारधाम’साठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

दैत्यसूदन मंदिर हे नवव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्य शैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. कोणार्क सूर्य मंदिर व खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्य शैलीच्या आधारे या मंदिराची रचना असल्याचे दिसते. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती स्थापित केलेली आहे भगवान विष्णू ने लवणासूर नावाचा राक्षसासोबत घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. त्या राक्षसाच्या नावावरून या गावाला लोणार हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. मंदिर निर्माण करताना स्थापत्य, वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांची सांगड घालण्यात आली आहे. मे महिन्यात शून्य सावली कालावधीत मंदिरामध्ये हा अघोषित किरणोत्सव होतो. हा किरणोत्सव जवळपास पाच दिवस भाविक भक्तांना बघायला मिळतो किरणोत्सव हा फक्त दहा मिनिटाचा असतो. त्यामुळे पर्यटकांना वेळेचे ठेवुनच दैत्यसूदन मंदिरात येणे आवश्यक आहे. हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्यात अनेक वर्षे दबून राहिले अशी दंत कथा आहे. नंतर त्याचा शोध लागला. ब्रिटिश राजवटीत १८२३ मध्ये सी. जे. ई. अलेक्झांडर याने लोणार सरोवर शोधले.

हेही वाचा…‘रोडकरी’ म्हटल्या जाणाऱ्या नितीन गडकरींच्या विदर्भात ‘हे’ काय घडलं? ‘या’ महामार्गावरील उड्डाणपूलास…

हजारो वर्षांपूर्वी लाखो टन वजनाची उल्का वेगाने आदळून लोणार सरोवर तयार झाले. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे. मातेच्या आज्ञेवरून वनवासाला जाताना जाताना राम लक्ष्मण सीता यांनी या निसर्गरम्य ठिकाणी वास केला. येथे सीता न्हाणी देखील आहे. या सरोवर इतकंच दैत्यसूदन मंदिर अद्भुत आणि विलोभनीय आहे.