नागपूर: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधकांचे प्रकरण खोदून काढून ते ईडीकडे सोपवण्यासाठी आणि जेव्हा विरोधक भाजपसोबत तेव्हा त्यांच्या प्रकरणावर मौन बाळण्यासाठी ओळखले जातात. आता ते एका नवीन प्रकरणासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. ते दोनदा नागपुरातही येऊन गेले आहेत.

राज्यात जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाला असून खोटी माहिती देऊन प्रमाणपत्र घेणारे काही नागपुरातही आहेत. त्यामुळे ज्यांनी शासनाची फसवणूक करून असे प्रमाणपत्र घेतले असतील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

खोटी माहिती देऊन जन्मप्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या विरोधात किरीट सोमय्या राज्यभरात फिरून मोहीम राबवत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ते याच संदर्भात नागपुरात आले होते. यावेळी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली होती. शुक्रवारी सोमय्या यांनी पुन्हा एकदा महापालिकेत भेट देत या मुद्यावर माहिती घेतली.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, खोट्या माहितीच्या आधारे जन्मप्रमाणपत्र घेणाऱ्यांचे प्रमाण नागपुरातही आढळून आले आहे. यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिल्यानंतर नागपूर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेत अशा काही कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे प्रमाणपत्रांमध्ये चुकी झाल्याचे आढळून आले आहे. याची अधिक सखोलपणे चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नायब तहसीलदारांकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्राबद्दल विचारले असता सोमय्या म्हणाले, हा घोटाळा पुढे आल्यानंतर नायब तहसीलदारांना दिलेले प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले आहे. दरम्यान असे असले तरी तरी दिलेले प्रमाणपत्र परत घेण्याचे काम अजूनही सुरु झालेले नाही. त्यामुळे खोट्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवणारी व्यक्ती त्याचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य बघता या व्यक्तींकडून ते प्रमाणपत्र लवकरात लवकर काढण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बोगस जन्मप्रमाणपत्राच्या संदर्भात महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय संयुक्तपणे चाचपणी करत असून येणाऱ्या काळात यात आणखी काही बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच यातील दोषींवर लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.