अहिल्यानगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत श्रीगोंद्यातील भामट्याने अहिल्यानगरमधील तिघा व्यावसायिकांना ७० लाख रुपयांना गंडवल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी समीर शब्बीर सय्यद (रा. मुंजोबा चौक, श्रीगोंदा) याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इमान बशीर शेख (रा. हाजी इब्राहिम कॉलनी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इमान शेख, त्यांचा भाऊ अखलाख शेख आणि मित्र जहीर शेख हे तिघेही महापालिकेचे ठेकेदार आहेत. सन २०२३ मध्ये आरोपी समीर सय्यद याने, मी शेअर मार्केटमध्ये मोठी कमाई केली आहे, तुम्हीही पैसे गुंतवा, तुम्हाला भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवत तिघांचा विश्वास संपादन केला.सय्यदच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, तिघांनी मिळून ५ महिन्यांसाठी ७० लाख रुपये गुंतवण्यास तयारी दर्शवली.
दि. २४ जून २०२४ रोजी स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरी करून, इमान शेख व अखलाख शेख यांनी प्रत्येकी १५ लाख, तर जहीर शेख यांचे ४० लाख रुपये असे एकूण ७० लाख रुपये दिले. या व्यवहारापोटी सय्यदने फिर्यादी व जहीर शेख यांना अनुक्रमे ३० लाख व ४० लाखांचे दोन धनादेश दिले होते. मुदत संपल्यानंतर धनादेश बँकेत जमा केले असता, खात्यात पैसे नसल्याने ते बाऊन्स झाले. फिर्यादींनी श्रीगोंदा येथे जाऊन चौकशी केली असता, आरोपी समीर सय्यद हा अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असल्याची माहिती त्यांना समजली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.
