नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाच्या बरखास्तीनंतर नव्याने गठित होणाऱ्या मंडळासाठी वनखात्याच्या मुख्यालयातून पाठवण्यात आलेल्या यादीवरून चर्चा रंगली आहे. वने आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मंडळात निर्णय घेतले जात असताना मंडळात या क्षेत्रातील अभ्यासू, संशोधक, संवर्धकांचा भरणा असावा. मात्र, त्यांना डच्चू देत धनाढय़ रिसॉर्ट मालक, एकाच विचारांचे, राजकीय नेतृत्वाचे नातेवाईक, खात्यातील कामांचे ठेकेदार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवे सरकार नवे मंडळ यानुसार राज्य वन्यजीव मंडळाच्या बरखास्तीचा आदेश आठ सप्टेंबरला काढण्यात आला. मात्र, त्याआधीच म्हणजे पाच सप्टेंबरला वनखात्याच्या नागपूर मुख्यालयातून मंडळाच्या सदस्यत्वासाठी १६ जणांच्या नावाची यादी पाठवण्यात आली. मुख्यमंत्री मंडळाचे अध्यक्ष तर वनमंत्री हे उपाध्यक्ष असतात. याशिवाय सदस्य म्हणून इतर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. या मंडळावर येणारा सदस्य हा वने आणि वन्यजीव संवर्धन तसेच कायद्याची माहिती असणाराच हवा. प्रसंगी मंडळाचे निर्णय वने आणि वन्यजीवांच्या विरोधात जाताना दिसल्यास त्याला विरोध करणारा असावा. मात्र, अलीकडच्या काळात वनखात्याला अशी मंडळी नकोशी झाली आहे. खात्याच्या तसेच मंडळाच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणणारी व्यक्तीच त्यांना हवी असते आणि त्याचा प्रत्यय सदस्यत्वासाठी प्रस्तावित नावांच्या यादीत दिसून येत आहे. मोजके एका हाताच्या बोटावर मोजणारी नावे वगळली तर उर्वरित सर्व नावे अचंबित करणारी आहेत. यात धनाढय़ रिसॉर्ट मालक, राजकीय नेतृत्त्वाचे नातेवाईक, खात्याच्या आर्थिक बाबींशी ज्यांचा संबंध आहे आणि जे खात्याच्या कामाचे ठेके घेतात, तसेच एकाच विचाराशी बांधीलकी असणारे सदस्य यात आहेत. राज्य वन्यजीव मंडळ हे वने आणि वन्यजीव संवर्धनाच्या भवितव्याचे, अस्तित्त्वाचे ध्येयधोरण ठरवणारे मंडळ आहे. त्यामुळे मंडळात असणारी व्यक्ती या विषयाशी वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ आणि अभ्यासूच असली पाहीजे. यात संशोधक, संवर्धन आणि या विषयातील शिक्षणाशी तज्ज्ञ व्यक्तीच असावा. त्याचवेळी मंडळ गठीत होत असताना सदस्यत्वासाठी वनखात्याकडून प्रस्ताव मागवण्याचा किंवा पाठवण्याचा प्रकार आजतागायत घडला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders relatives contractors and resort owners name for state wildlife board membership zws
First published on: 15-09-2022 at 03:05 IST