अमरावती: जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने पावसाच्या अचूक नोंदी घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीवर आधारित पंचनाम्यांचे सध्याचे निकष बदलून सरसकट पंचनामे करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, संत्री आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खोडके यांनी स्वतः हिरुळपूर्णा, आंसेगांव पूर्णा, कारंजा बहिरम या भागांची पाहणी केली असून, तेथील परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे नसल्याने पावसाच्या अचूक नोंदी घेणे शक्य नाही.
त्यामुळे पावसाच्या आकडेवारीवर आधारित पंचनाम्यांचे सध्याचे निकष बदलण्याची गरज असल्याचे खोडके यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरू करावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, शासनाकडून आदेश मिळवून तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पंचनामे आणि अहवाल सादर करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संजय खोडके यांनी आज जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यादरम्यान, त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. सततच्या पावसामुळे पीक हातातून गेले आहे. संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आला असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संजय खोडके यांनी दिले. संजय खोडके यांनी संत्री बागांचीही पाहणी केली.
काही दिवसांतच सोयाबीनची काढणी सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसाने शेतात तलाव साचले. पाण्याचा निचरा होत नसल्याने सोयाबीन पीक खराब झाले आहे. तुरीचे पीक पिवळे झाले आहे, तर कपाशीच्या पिकाचीही अवस्था बिकट आहे. सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगामधून अंकूर दिसून येत आहेत. पीक जागेवरच कुजून गेले आहे.