नागपूर : मातृत्व जोपासण्याकरिता आई ही कुठलाही प्रसंग स्वतःच्या जीवावर ओढून घेण्याकरिता सक्षम असते यात दुमत नाही. मग आई ही हिंस्त्र श्वापदाची असो किंवा बुद्धीजिवी माणसाची. निश्चितच आईचे आपल्या अपत्याप्रतीचे प्रेम हे जीवापार असते. याचे नुकतेच उदाहरण म्हणजे हिंगणी लगतच्या आमगाव जंगली शिवारात रस्त्यालगत अचानक बिबट्याचा ४५ दिवसांचा बछडा आढळून आला.
गावकऱ्यांनी लगेच या घटनेची माहिती वर्धा वनविभागाला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणी वर्धा, हिंगणी व हिंगणी (वन्यजीव) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले. यावेळी पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्रातील चमुला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आढळलेल्या बिबट बछड्याला गावकऱ्यांनी वनविभागाच्या सुपूर्द केले व त्याची पुढील वैद्यकीय तपासणी पीपल फॉर एनिमल्सच्या वैद्यकीय चमूमार्फत करण्यात आली.
बछड्याच्या शरीरात सौम्य निर्जलीकरण म्हणजेच पाण्याची कमतरता आढळली व त्याच्यावर पुढील उपचार करण्यात आला. तो सुदृढ असल्याचे निष्पन्न होताच बछड्याला त्याच्या आईसोबत पुनर्मिलन होण्याकरिता त्याच ठिकाणी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न सुरू करण्यात आले. ठीकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले. वर्धा व हिंगणी वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी व पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यजीव केंद्रातील चमू यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोहीम राबविण्यात आली. त्याला एका मोठ्या कॅरेटच्या मदतीने योग्य ठिकाणी ठेवण्यात आले.
लाईव्ह कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून रात्रभर पाळत ठेवण्यात आली असता मध्यरात्रीच्या सुमारास सदर बछड्याचे आपल्या आईसोबत पुनर्मिलन यशस्वीरित्या पार पडले. असे बछडे सापडले की, त्यांना जगवणे हे मोठे आव्हान असते. त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोणता आजार तर नाही ना किंवा कुठे जखम झालेली तर नाही ना हे कळते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांवरूनही त्यांच्या तब्येतीचा अंदाज येतो.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणी लगतच्या आमगाव जंगली शिवारात रस्त्यालगत बिबट्याचा बछडा आढळून आला. बछड्याला गावकऱ्यांनी वनविभागाच्या सुपूर्द केले व त्याची वैद्यकीय तपासणी पीपल फॉर एनिमल्सच्या वैद्यकीय चमूमार्फत करण्यात आली. उपचारानंतर बछड्याचे त्याच्या आईशी पुनर्मिलन करण्यात आले.… pic.twitter.com/1Nw2Op2uMv
— LoksattaLive (@LoksattaLive) August 20, 2025
या बछड्यांना पुन्हा आईकडे सोपवण्याआधी त्यांचा सांभाळ करणे ही कसोटी असते. अशावेळी त्यांना ठराविक आहार देऊन जगवलं जाते. बिबट्याचे बछडे दोन महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना खाऊ घालता येतात. पण तोपर्यंत दूध त्यांना बाटलीने पाजत राहावे लागते. बिबट्याची मादी आणि बछड्यांची ताटातूट झाली तर मादी आक्रमक होते. अशा वेळी ती हल्ले करण्याचा धोका असतो. पण, तिचे बछडे तिला पुन्हा मिळाले तर हा धोका कमी होतो.