नागपूर : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मार्गावरील राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅम्प परिसरात ट्रकच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ट्रकच्या धडकेमुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी वनविभागाला तातडीने कळवले. वनखात्याचे पथकही तातडीने घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता. या भागात बिबट्याची हालचाल वाढल्याने अधिक काळजी घेण्याची सूचना वनखात्याने केली.
दोन ते तीन महिन्यांपूर्वी अमरावती शहरातील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक नऊ येथील दोन मजली इमारत असणाऱ्या कंपनी कार्यालयात चक्क एक बिबट रात्री फेरफटका मारुन गेला. जिन्यावरून पायऱ्या चढत मोठ्या ऐटीत इमारतीत फिरणारा हा बिबट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. एसआरपी कॅम्प परिसरातील कार्यालयीन इमारतीत बिबट शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक बिबट फिरत असलेल्या इमारतीच्या परिसरात दाखल झाले. तेव्हा या इमारतीत फेरफटका मारून बिबट पुन्हा पायऱ्यांवरून उतरून इमारती बाहेर पडला.
तो लगतच असणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भिंतीवरून विद्यापीठ परिसरातील झुडपामध्ये पळाला. राज्य राखीव पोलीस दल वसाहत परिसरात गत काही वर्षांपासून अनेकदा बिबट्याचे वास्तव्य आहे. लगतच असणाऱ्या वडाळी, पोहरा जंगल परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल परिसराला लागून असणाऱ्या काही निवासस्थानाजवळ सुद्धा सायंकाळच्या सुमारास बिबट दिसतो. झुडपात, एखाद्या खड्ड्यात बिबट दडवून बसतो. राज्य राखीव पोलीस दल वसाहतीमधले अनेक कुत्र्याची शिकार बिबट्यांनी केली आहे. परिसरात फिरणारा बिबट राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्यालयाच्या इमारतीत शिरला.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मार्गावर ट्रकच्या धडकेमुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झालाhttps://t.co/ZfyIjgKlXt#Maharashtra #Amravati #leopard #leopardaccident pic.twitter.com/ITr3VxnhkY
— LoksattaLive (@LoksattaLive) October 4, 2025
सुदैवाने एसआरपीएफचे जवान त्याच्या समोर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ टाकला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला लागून असणाऱ्या तपोवन परिसरात डॉक्टर कॉलनी येथे १५ जूनला बिबटने चक्क एका घराच्या गेटवरून घराच्या आवारात उडी घेतली होती. यावेळी घरच्या आवारात असणाऱ्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली होती. हा व्हिडिओ देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. तपोवन, विद्यापीठ, राज्य राखीव पोलीस दल आणि महादेवखोरी या भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेला बिबट हा राज्य राखीव पोलीस दलाच्या इमारतीत शिरलेलाच असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्गावरच नव्हे तर राज्य महामार्गावर देखील वाहनांच्या धडकेत वन्यप्राणी मृत्युमुखी पडत असून आता शहरात येणाऱ्या वन्यप्राण्यांचा देखील अपघाती मृत्यू होत आहे.