भंडारा : शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ५३ पार करणाऱ्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी – साकोली महामार्गावर मुंडीपार सडकजवळ असलेल्या धाब्याजवळ रात्री ११.२० वाजताच्या सुमारास घडली.

बिबट ठार झाल्याचे माहिती होताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. ठार झालेली बिबट अंदाजे दोन वर्षे वयाची आहे. शिकारीच्या शोधात ती रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना यादव धाबा आणि रॉयल धाबा यांच्यामध्ये पोहोचताच अज्ञात वाहनाने तिला जबर धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीच बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन लाखनी परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जांभळी नर्सरी येथे मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी घेतली सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांची भेट

भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली राष्ट्रीय महामार्ग ५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग ६) वरील वन्यजीव भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. अशातच २० नोव्हेंबर २०२२ मध्ये एका बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. शिवाय मागील महिन्यात याच परिसरात एका बिबट्याचा मृतदेह आढळला होता. लागोपाठ झालेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – उडत्या विमानातून धूर; नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्ग परिसरात वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र अत्यंत कासव गतीने सुरू असलेले हे काम आता वन्यप्राण्यांच्या जिवावर उठले आहे. पहिल्या सूचीतील वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना वारंवार घडून मोठी हानी होत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी सांगितले आहे. हा भ्रमणमार्ग वनविकास महामंडळाच्या अधिनस्थ असून त्यांनी तो वन विभागाला हस्तांतरित करावा, अशी मागणी नदीम खान यांनी केली आहे.