नागपूर : अदानी उद्योग समुहाच्या प्रस्तावित दहेगाव भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे. बुधवारी नागपुरातील वलनी येथे जनसुनावणी सुरू होताच संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत येथे खाणीला परवानगी देण्यास विरोध दर्शवला .
संतप्त नागरिकांनी कोळसा खाण रद्द करा, तानाशाही नाही चलेगी आणि इतर नारे देत सरकारवर संताप व्यक्त केला. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबुजा सिमेंट्स लि. यांच्या दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी बुधवारी (१० सप्टेंबर) थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांसह भाजपचे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि सावनेरचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी विरोध आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांनी प्रदूषण मंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले की, या प्रकल्पामुळे परिसरातील १० गावांसह तेथील शेतकरी, नागरिक, पशुधनासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. नागरिकांवर रोग व आजारांचे संकट, विस्थापन, जीवाला धोका, उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती आहे.
प्रदूषण मंडळाने प्रकल्प स्थळी, अंबुजा सिमेंट्स लि., दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण, ख. नं. ९०, वलनी, ता. नागपूर (ग्रामीण) येथे जनसुनावणी सुरू करण्याची तयारी केली आहे. या खणीला स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी व विविध संघटनां उपस्थित झाल्या आहे. येथे सुनावणी सुरू झाल्यावर गावकरी आणि विविध संस्था व नेते आपले मत मांडणार आहे. आता जनसूनवणीत या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आणि विरोधात कोण बाजू मांडणार?, त्याबाबत काय युक्तिवाद केला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अदानीच्या कोळसा खाणीला स्थानिक नागरिकांचा विरोध, संताप… मोर्चा काढत…
— LoksattaLive (@LoksattaLive) September 10, 2025
अदानी उद्योग समुहाच्या प्रस्तावित दहेगाव भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे. बुधवारी नागपुरातील वलनी येथे जनसुनावणी सुरू होताच संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत येथे खाणीला परवानगी… pic.twitter.com/4uVnC0DQEd
दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाची सद्यस्थिती काय ?
दहेगाव गोवारी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १ दशलक्ष टन असून, त्याचा विस्तार सुमारे १ हजार ५६२ हेक्टर परिसरात आहे. या प्रकल्पाचा परिणाम गोवारी, सिंदी, खैरी, टोंडा खैरी, बोरगाव खुर्द, बेलोरी, झुनकी, वलनी, खांडाला, पारडी आदी गावांवर होण्याची शक्यता आहे.
आमदार समीर मेघे यांचे म्हणणे काय ?
दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह आमचाही तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाबाबतच्या सुनावणीत प्रकल्पाची सखोल माहिती घेऊन विरोध दर्शवला जाईल, अशी माहिती हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.