वर्धा: भाजपच्या विदर्भ विभागीय नियोजन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाषण गाजले ते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे. कार्यकर्त्यांना काय काय मिळणार याची यादी देत त्यांनी मने जिंकलीच आणि कार्यकर्त्यात जोश निर्माण केल्याचे चित्र उमटले. आमच्या निवडणुकीसाठी तुम्ही झटले, आता आमची वेळ तुम्हास वेळ देण्याची, असेही त्यांनी सांगून टाकले.
समारोप प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, मंत्री आकाश फुंडकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष संजय गाते, सर्व भाजप आमदार, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणात बावनकुळे म्हणाले की विविध योजना लोकांपर्यंत न्या. लोकच तुम्हास निवडून आणतील. आता तिकिटासाठी लगबग सूरू आहे. माझ्या मुलीला, मुलाला तिकीट द्या, म्हणून मागणी सूरू झाली आहे. पण प्रदेशाध्यक्षांच्या साक्षीने सांगतो, जो जिंकू शकतो, त्यालाच तिकीट मिळणार, असे बावनकुळे यांनी जाहीर केले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू होतील. पण या अवधीत ४० दिवस सणासूदीचे आहेत. केवळ २२ दिवस मिळणार. म्हणून आतापासून तयारीस लागा.
निवडणुका झाल्यात की ७६२ विविद पदे व १४० मंडळावरील पदे भरल्या जातील. काम करणाऱ्यालाच ती पदे मिळतील. जन सुरक्षा मुद्दा तुम्हास हमखास मते मिळवून देणार. आज तुमच्या घरात जे बाळ आहे, त्याचे हे सुरक्षा कवच ठरणार. कारण पुढील पिढी ताब्यात घेण्याचा अर्बन नक्षलीचा डाव जन सुरक्षा हाणून पाडणार.या विधेयकाची माहिती प्रत्येक बूथवर द्या. पुढील १५ वर्ष निवडणुका जिंकू. काहीच बाकी करायचे नाही. तुकडे बंदी हटविली त्याचा फायदा सामान्य लोकास होणार आहे. पांधन रस्ते योजनेसाठी ११ आमदारांची समिती गठीत केली आहे.
राज्यात प्रत्येक पांधन रस्त्याचे काम पूर्ण करणार. स्वामीत्व कायदा आणणार. कर भरणे म्हणजे मालकी नव्हे. रजिस्ट्री म्हणजे मालकी नाही. जोपर्यंत कलेक्टरचा सात बारा मिळणार नाही, तो पर्यंत खरी मालकी नाही. स्वामीत्व महत्वाचे. प्रत्येक फ्लॅट धारकांस ते देण्यात येईल. नगरपालिका निवडणुकीत हे लोकांना सांगा.मोदी सरकार, फडणवीस सरकार येण्यासाठी कार्यकर्त्यांनी घाम गाळला. रक्ताचे पाणी केले. आता पुढील निवडणुकीत तुम्ही जिंकून येण्यासाठी आम्ही नेते श्रम घेणार. सत्ता आपलीच येणार, हा विश्वास बाळगा आणि कामाला लागा. जो काम करेल त्याला तिकीट देणारच. सिकंदर होण्यासाठी या निवडणुका लढायच्या आहेत, असे बावनकुळे म्हणाले.