लोकसभा निवडणूक काळातील तक्रारीची आयोगाकडून दखल; रवींद्र ठाकरे नवे जिल्हाधिकारी
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची आज शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून शासनाने तडकाफडकी बदली केली. त्यांच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या जागी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी मुद्गल यांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेणाऱ्या अनेक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. अलीकडेच त्यांनी आयोगाला पत्र पाठवून मुद्गल यांच्याकडून विधानसभा निवडणुकीचे काम काढून घ्यावे, अशी विनंती केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने मुद्गल यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाला दिल्याची माहिती आहे. त्यानुसार शुक्रवारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुठे यांनी बदली आदेश जारी केले. मुद्गल यांची नागपूरमध्येच अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे यांच्याकडे वनामतीच्या संचालकपदाचाहीअतिरिक्त कार्यभार आहे. २००७ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असलेले मुद्गल यांनी २३ एप्रिल २०१८ ला जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यापूर्वी ते महापालिकेचे आयुक्त होते. मुद्गल यांच्या जागी येणारे ठाकरे सुद्धा महापालिकेतूनच येत आहेत, हे येथे उल्लेखनीय.
निवडणूक काळात आयोगाच्या निर्देशानुसार सनदी अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली होण्याचा अलीकडच्या काळातील पूर्व विदर्भातील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी झालेल्या गोंदिया-भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी तेथील तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली होती.
पटोलेंच्या तक्रारींची पाश्र्वभूमी
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या कार्यप्रणाली विरुद्ध एकूण ५२ तक्रारी केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने नागपूरमध्ये मध्य नागपूर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या जागेवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, मतमोजणीस्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षपाती वागणूक देणे तसेच मतमोजणीस्थळाच्या प्रवेशपत्राचे वाटप करताना नियमभंग करणे आदींचा समावेश होता. पटोलेंच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवल्याचे मुद्गल यांनी त्यावेळी सांगितले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही पटोले यांच्या विरुद्ध मतमोजणी स्थळावरील प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून गोंधळ घालण्याची तक्रार केली होती. त्यासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून सीआयडी मार्फत या प्रकरणाची चौकशीही चौकशी सुरू आहे.
पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी नागपूर जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघातून एकूण १७६ अर्ज निवडणूक शाखांमधून इच्छुकांनी खरेदी केले मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. १७६ पैकी ११६ अर्ज शहरातून तर ६० अर्ज ग्रामीणमधून गेले. सर्वाधिक ३५ अर्ज उत्तर नागपूर विधानसभेसाठी तर सर्वात कमी ३ अर्ज उमरेड मतदारसंघासाठी नेण्यात आले. सोमवारनंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज दिवसभर बाराही मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी सर्व तयारी केली होती.
११निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
विधानसा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण ११ निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात चार खर्च निरीक्षकांचा तर सातसामान्य निरीक्षकांचा समावेश आहे.खर्च निरीक्षकांपैकी शशी भूषण यांच्याकडे काटोल, सावनेर आणि हिंगणा, गौतम पात्रा यांच्याकडे उमरेड, कामठी आणि रामटेक, सुब्रा चक्रवर्ती यांच्याकडे पूर्व, मध्य आणि उत्तर नागपूरची तर प्रतीकसिंह यांच्याकडे दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पश्चिम नागपूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. एन प्रसन्ना, जयसिंह,ऐलानचेझियन, सुरेशचंद्र, विजयसिंह दुर्ग, राजेश शर्मा आणि वेदप्रकाश वर्मा हे सामान्य निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.