देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पूर्व विदर्भात गेल्या आठवडय़ात संपला. एकेकाळचा पक्षाचा गड अशी ओळख असलेल्या विदर्भात पुन्हा पाय रोवता यावे, यासाठी काँग्रेसने या राज्यस्तरावरील यात्रेचा शेवट विदर्भात केला. गेल्यावेळी पाठ फिरवलेल्या मतदारांनी पुन्हा आपल्याकडे वळावे, सोबतच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंतर्गत गटबाजी दूर व्हावी, पक्षसंघटना मजबूत व्हावी, कार्यकर्त्यांमध्ये जोश यावा व नेत्यांमध्ये मनोमिलन व्हावे, हा या यात्रेचा खरा उद्देश होता. सत्तारूढ भाजपच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचणे हा हेतू केवळ दाखवण्यासाठी होता. विदर्भात पहिल्या टप्प्यात ही यात्रा अमरावती विभागात फिरली. या विभागात पक्षाची अवस्था गेल्या निवडणुकीपासून खिळखिळी झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने पक्ष संघटनात्मक पातळीवर मजबूत होईल ही पक्षाच्या नेत्यांची आशा स्थानिक पातळीवर फोल ठरली. नेत्यांची भाषणे ऐकायला लोक आले, पण अनेक ठिकाणी पक्षाच्याच स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली. अमरावतीत पक्षाचे दोन आमदार आहेत. वीरेंद्र जगताप व यशोमती ठाकूर. हे दोघेही राहुल गांधींच्या वर्तुळातील म्हणून ओळखले जातात. मात्र, मतदारसंघाच्या बाहेर त्यांचा प्रभाव नाही. विभाग तर सोडाच पण जिल्ह्य़ाच्या इतर भागाकडे हे आमदार लक्ष देत नाहीत. बुलढाण्यात सपकाळ सोडले तर वऱ्हाडात सर्वच जिल्ह्य़ात अशीच स्थिती आहे. कसलाही जनाधार नसलेल्या शेखावतांकडे अमरावतीची सूत्रे आहेत. यवतमाळात पराभूतांच्या भांडणाने कळस गाठला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत या विभागात पक्षाची स्थिती सुधारण्याऐवजी खालावतच गेली आहे. खरे तर सध्याच्या सरकारच्या विरोधात वऱ्हाडात तीव्र असंतोष आहे. केवळ नागपूरचा विकास केला जात आहे, अशी भावना जनतेच्या मनात आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम या भागातील काँग्रेसच्या नेत्यांचे, पण ते कमालीचे शांत आहेत. हा असंतोष आपसूकच मतपेटीतून पक्षाच्या पारडय़ात पडेल, या भ्रमात हे नेते असतील तर हा भ्रमाचा भोपळा निवडणुकीत फुटण्याचीच शक्यता जास्त आहे.

पूर्व विदर्भात सुद्धा याहून फारसे वेगळे चित्र नाही. येथे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे प्रकार काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असतात, पण त्यात एकवाक्यता दिसत नाही. गेल्या साडेचार वर्षांत पराभवाची मरगळ झटकून जो जोश संघटनेत यायला हवा होता, तो आलेला नाही. पूर्व विदर्भात पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेली गटबाजी ही पक्षासमोरची सर्वात प्रमुख समस्या आहे व त्यावर अद्याप तोडगा काढता आला नाही. भंडाऱ्याची पोटनिवडणूक जिंकल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात चैतन्य पसरेल ही आशा फोल ठरली आहे. उपराजधानीत अजूनही मुत्तेमवार विरुद्ध इतर अशी सरळसरळ विभागणी आहे. संघटनेची सूत्रे मुत्तेमवारांकडे असल्याने नितीन राऊत, अनिस अहमद या यात्रेकडे फिरकले सुद्धा नाहीत. राऊत तर पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रम होते वगैरे अशी बतावणी ते करतील पण त्याला अर्थ नाही. अशा कार्यक्रमातून एकजुटीचा संदेश जायला हवा, तोच गेला नाही. अनिस अहमद तर कायम दिल्लीत असतात. ते नेमके कोणत्या पक्ष मुख्यालयात असतात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. सतीश चतुर्वेदी सध्या पक्षाच्या बाहेर आहेत, पण पालिकेतील काँग्रेसचा गट तेच चालवतात. मध्यंतरी त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या, नंतर त्या थंडावल्या. अशोक चव्हाणांना हा तिढा अजून सोडवता आला नाही. त्यामुळेच की काय ते या यात्रेचा प्रारंभ असलेल्या नागपुरातून सहभागी न होता रामटेकहून झाले. खरे तर काँग्रेसला उपराजधानीत नव्या चेहऱ्यांची तीव्र गरज आहे. ते समोर आणायचे पक्षनेत्यांच्या मनात आहे, पण जुन्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यातून हा पक्ष अजून बाहेर पडू शकला नाही. ही यात्रा भंडाऱ्यात गेली पण तिथे नाना पटोलेंचाच पत्ता नव्हता. तिथल्या सभेत भाषण करणाऱ्या नेत्यांनी त्यांचे साधे नावही घेतले नाही. याच पटोलेंमुळे भंडारा पोटनिवडणूक राष्ट्रवादीला जिंकता आली. या निकालामुळे काँग्रेसला सुद्धा मोठा दिलासा मिळाला. आता त्यांनाच बाजूला सारून यात्रा काढण्यात आली. विदर्भातील शेतकरी वर्गात पटोलेंविषयी आकर्षण आहे. काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी याच वर्गाला जवळ करण्याचा धडाका लावला होता. नंतर ते अचानक शांत झाले. पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी सोपवली. अशी जबाबदारी सोपवून नेत्यांना शांत करण्याची मोठी परंपरा काँग्रेसमध्ये आहे. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का, असेही आता पक्षात विचारले जात आहे. हेच पटोले यात्रेच्या समारोपाला हजर होते. ही यात्रा चंद्रपूर, गडचिरोली या भाजपचा गड असलेल्या जिल्ह्य़ात फिरली. तेथील नेतृत्व वडेट्टीवारांकडे असल्याने पुगलिया गट यात्रेपासून दूर होता. त्यातच चंद्रपुरात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दाखवलेली अनुपस्थिती अनेक चर्चाना जन्म देणारी ठरली. राजकारण करताना एकमेकांना सांभाळून घेण्याची संस्कृती काँग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याचा या गैरहजेरीशी संबंध जोडला गेला.

दोन टप्प्यात यात्रा काढूनही विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही कमालीचा विसंवाद आहे हेच यातून ठळकपणे दिसून आले. या बळावर निवडणुकांना सामोरे कसे जायचे, असा प्रश्न आज कार्यकर्ते विचारताना दिसतात. सरकारवर टीका मुंबईत बसूनही करता येते. यात्रेच्या माध्यमातून गावोगाव गेले तर पक्षाची ताकद वाढते व त्याचा फायदा पक्षाला होतो. हा उद्देश सफल झाल्याचे या यात्रेतून दिसले नाही. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने सुद्धा विदर्भात यात्रा काढली होती. या पक्षाच्या विदर्भातील ताकदीच्या तुलनेत यात्रेला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. यामागील कारणे दोन होती. एक तर यात सहभागी झालेल्या नेत्यांनी मध्येच निघून जाण्याचे कटाक्षाने टाळले व दुसरे पराभवानंतरचा हा पहिलाच प्रयोग होता. काँग्रेसची यात्रा या पातळीवर सुद्धा कमनशिबी ठरली. यात्रेत सहभागी झालेले नेते अनेकदा यात्रा सोडून गेले, पुन्हा परतले. शिवाय नेत्यांमधील विसंवाद ठिकठिकाणी दिसून आला. त्यामुळे ही यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली हे अनेकांना कळलेच नाही. येत्या निवडणुकीत भाजपची सारी मदार विदर्भावर आहे. सत्तेचा फटका इतर ठिकाणी बसला तरी विदर्भातून सारी कसर भरून काढायची असे नियोजन भाजपने अतिशय काटेकोरपणे केले आहे. या डावपेचाला मात द्यायची असेल तर काँग्रेसला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. ती टाकण्याचा प्रत्येक प्रयत्न अडखळतो आहे, हेच या निमित्ताने पुन्हा दिसून आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar article by devendra gawande
First published on: 17-01-2019 at 01:46 IST