देवेंद्र गावंडे

‘भारत जोडो कशासाठी? तो तुटलाच कुठे?’ अशा शब्दात राहुल गांधींच्या यात्रेची हेटाळणी करणाऱ्या विरोधकांकडे काँग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले तरी चालेल पण या यात्रेच्या निमित्ताने विदर्भातील नेत्यांनी ज्याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे ते दिले जात आहे का? हा कळीचा प्रश्न उपस्थित झाला तो यात्रेच्या अगदी अगोदर. मुळात या यात्रेचा उद्देश देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे असा सांगितला जात असला तरी पक्षापासून दुरावलेला मतदार जवळ करणे हाही एक हेतू असल्याचे आता लपलेले नाही. खुद्द पक्षाच्या नेत्यांनी संघटनात्मक मजबुतीचा मुद्दा उघडपणे सांगितलेला. अशा स्थितीत ही यात्रा विदर्भात प्रवेश करताना पक्षनेत्यांनी काय करायला हवे हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. १५ ते २० नोव्हेंबर असे पाच दिवस ही यात्रा विदर्भात असणार. त्याला जोरदार प्रतिसाद लाभलेला दिसावा म्हणून वैदर्भीय नेते व यात्रेच्या आयोजनात सक्रिय असलेल्या नागरी संघटना सभा, बैठका घेत असल्या तरी त्यात व्यापक दृष्टिकोनाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. यानिमित्ताने पक्षापासून दुरावला गेलेला मतदार कसा जोडता येईल यादृष्टीने नेत्यांकडून प्रयत्न व्हायला हवे होते. प्रत्यक्षात जिल्ह्याजिल्ह्यातले नेते वाहने भरून जास्तीत जास्त कार्यकर्ते वाशीम, अकोला व बुलढाण्यात कसे नेता येतील यातच व्यग्र आहेत. मग राहुल गांधींच्या जाहीर सभेला गर्दी जमवणे व यात्रा यात फरक काय राहिला?

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा

मध्यंतरी योगेंद्र यादव, डॉ. गणेश देवी व देशभरातील नागरी संघटनांचे प्रतिनिधी नागपुरात आले. त्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन घनघोर चर्चा केली. उद्देश हाच की यात्रेला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळावा. यात सहभागी कोण झाले तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था. या संस्था मतदारांवर खरोखरच प्रभाव पाडू शकतात का? त्यांच्या सांगण्यावरून नेमका कोणता समूह पक्षाशी जुळेल? याचे ठाम उत्तर कुणाजवळही नाही. याचा अर्थ अशा संस्थांना सहभागीच करून घेऊ नये असा नाही. मात्र अशा उपक्रमात काही मान्यवरांचा प्रतीकात्मक सहभाग लक्षवेधी ठरू शकतो. त्यादृष्टीने प्रयत्नच झाले नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर लीलाताई चितळे. अजूनही धार्मिक द्वेषाच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावण्याची क्षमता ठेवून असणाऱ्या लीलाताई गांधी, नेहरूंच्या सहवासात वावरलेल्या. त्यांची यात्रेतील उपस्थिती लक्षणीय ठरू शकते हे आयोजकांपैकी एकाच्याही लक्षात येऊ नये? स्वातंत्र्यासाठी लढताना महात्मा गांधींनी दांडीयात्रा काढली. त्यात मूलचे बापूराव गहाणकर सहभागी झाले होते. गांधींचे कट्टर अनुयायी अशी त्यांची ओळख. आज ते हयात नाहीत पण त्यांचा मुलगा ‘मोहन’ला यात सामील करून घ्यावे असे एकालाही वाटत नसेल तर राहुल गांधींच्या पायपिटीचे गांभीर्य अजून कुणाच्याही ध्यानात आले नाही असाच त्याचा अर्थ. ही यात्रा जाणार आहे पश्चिम विदर्भातून. त्यामुळे नागरी संघटनांच्या पुढाकाराने येथे आयोजित केलेली सभा अमरावतीला झाली असती तर ते योग्य ठरले असते. तसेही अमरावती सध्या धार्मिक द्वेषामुळे चर्चेतले. कट्टरतावाद्यांची प्रयोगशाळा झालेले. तरीही नागपुरात सभा घेतली गेली. त्याचा फार फायदा होण्याची शक्यता दुरापास्तच. या सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते व या संघटनांमध्ये समन्वय नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अनेक नेत्यांनी त्यांची नावे असूनही पाठ फिरवली.

सध्या विदर्भातील पक्षाचे नेते जिल्हावार बैठका घेऊन कार्यकर्त्यांचा सहभाग निश्चित करत आहेत. त्यांचा पेहराव कोणता असावा, झेंडा कुणी पकडावा याचेही नियोजन केले जात आहे. हे सारे सुरू आहे ते पक्षपातळीवर. पक्षाबरोबरचे लोक या उपक्रमाशी कसे जोडता येतील यावर एकही नेता विचार करताना दिसत नाही. अमरावतीच्या जवळच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेली भूमी गुरुकुंज मोझरी आहे. येथे मुख्यालय असलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या १५ हजार गावात शाखा आहेत. त्यात लाखो अनुयायी सक्रिय आहेत. दरवर्षी १४ ऑक्टोबरला मोझरीत पाच लाख लोक गोळा होतात. राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध, महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी ‘चले जाव’ सत्याग्रहात घेतलेला भाग, चिमूर व आष्टीचा लढा, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना बहाल केलेली ‘संत’ ही पदवी, नेहरूंशी असलेला त्यांचा स्नेह. हा सारा इतिहास काँग्रेसच्या एकाही विद्यमान नेत्याला ठाऊक नसेल का? पण यापैकी कुणीही या मंडळाशी संपर्क साधून त्यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले नाही. ही यात्रा पक्षविरहित तसेच देशाची एकता व अखंडता शिकवण्यासाठी जर असेल तर एका मोठ्या नागरी समूहाला त्यात सहभागी होण्याची विनंती का नाही?

‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ असे सांगणारा हा संत व त्याचे अनुयायी किमान यानिमित्ताने तरी जोडले जावेत हे नेत्यांच्या लक्षात येत नसेल तर या पक्षाचे भवितव्य कठीणच. हे अनुयायी भगवी टोपी वापरतात, त्यातून वेगळाच संदेश जातो असे फाटे फोडण्यात हे नेते आघाडीवर असल्याचे चित्र याच काळात दिसले. आज याच गुरुदेव सेवा मंडळात भाजपचे अनेक नेते सक्रिय झालेलेत. सेवामंडळाचे काम राजकारणविरहित आहे हे या सर्वांना ठाऊक. तरीही ते त्यांना सोबत घेतात. यातच राजकीय दूरदृष्टी सामावलेली. तशी ती काँग्रेसनेत्यांजवळ नसेल तर नुसती यात्रा काढून काय उपयोग? विदर्भाचाच विचार केला तर असे अनेक नागरी समूह व उपेक्षित घटक आहेत जे पक्षापासून दूर गेलेले आहेत. युद्धाच्या जखमा न विसरलेला व इंदिरा गांधींना मानणारा बंगाली समूह त्यातला एक. त्यांचाही सहभाग यात असावा असे एकाही काँग्रेस नेत्याला अजूनतरी वाटलेले नाही. विदर्भात प्रवेश करताच यात्रेकरूंनी ग्रामगीतेचा उल्लेख करणे, त्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे या एकाच कृतीतून अनेक गोष्टी साध्य होऊ शकल्या असत्या. मात्र तशी कल्पकता दाखवावी असे अजूनही नेत्यांना सुचले नाही. ही यात्रा हा एक प्रयोग आहे. तो कितपत यशस्वी होईल? राहुल गांधींना त्याचा फायदा मिळेल की नाही? पक्षाला त्याचा लाभ किती होईल? यामुळे विखारी वातावरण कमी होण्यास मदत होईल का? सामान्य लोकांवर याचा कसा प्रभाव पडेल? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील. मात्र या यात्रेचा सकारात्मक परिणाम साधायचा असेल तर नागरी संघटना व काँग्रेसच्या नेत्यांनी दूरदृष्टी दाखवायला हवी. नेमका त्याचाच अभाव विदर्भात दिसतो. समर्थकांना यात्रेत घेऊन जाणे, छायाचित्रे काढणे, त्याला समाजमाध्यमावर टाकणे एवढेच काम आपल्याला करायचे आहे अशा संकुचित विचारात हे नेते अडकले असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.