एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल भाजपचे आमदार परिणय फुके यांचे अभिनंदन! सध्या ते विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली. त्याचा आशय मोठा मजेदार. अलीकडे चित्रपट तसेच वेबसिरीजमधून राजकारण्यांना वारंवार खलनायक म्हणून रंगवले जाते. खुनी, भ्रष्टाचारी, स्त्रीलंपट, अन्याय करणारा अशी त्यांची प्रतिमा दाखवली जाते. यामुळे समाजात राजकीय नेत्यांविषयी चुकीची धारणा निर्माण होत असून हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असे फुकेंचे म्हणणे. म्हणून या चित्रपटांवर, मालिकांवर सरकारने बंधने घालावी, अशी त्यांची मागणी. यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलारांनी ती मान्य करायला नकार दिला. मात्र फुकेंच्या या कृतीमुळे आता चर्चेला तोंड फुटले म्हणून हा लेखनप्रपंच!
अलीकडे समाजातील सर्वच क्षेत्रांचे अध:पतन होत चाललेले. मग ते राजकारण असो वा अन्य कोणतेही क्षेत्र. यात पत्रकारिता सुद्धा आली. वाईटाची लागण झाली नाही असे कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिले नाही. मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर प्रतिबिंब उमटत असते ते याच अध:पतनाचे. जे समाजात घडते त्याचा आधार घेत कथानक गुंफणे हे काम आधीपासून होत आलेले. त्यात नवे काहीच नाही. एकेकाळी धान्याचा काळाबाजार करणारा व्यापारी हमखास दाखवला जायचा. गरिबांना लुबाडणारा सावकारही पडद्यावर असायचाच. नंतर हे मागे पडत गेले. इतर क्षेत्राच्या तुलनेत राजकारणाचा दर्जा जरा जास्तच वेगाने घसरला. त्यामुळे त्याची नोंद जो कुणी लेखक वा पटकथाकार असेल तो घेणारच. यावर फुके आक्षेप कसा काय घेऊ शकतात? राजकारण्यांची समाजातील प्रतिमा खराब होण्याला त्यांच्याकडून होणारी कृतीच जबाबदार आहे. ती घडू नये यासाठी फुके पुढाकार घेतील काय? आम्ही कसेही वागू मात्र कोणत्याही प्रकारच्या माध्यमाने त्याची दखल घेऊ नये असे त्यांना म्हणायचे आहे काय? विदर्भाचे मा.सा. कन्नमवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याआधी अनेक वर्षे ते राजकारणात होते. तरीही त्यांच्या वारसदारांकडे आजही राहायला घर नाही. त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नी बसने प्रवास करायच्या. हा साधेपणा आज राजकारणात राहिला आहे का?
आज कुणीही आमदार झाले की त्यांच्या संपत्तीत अचानक कैक पटीने वाढ होत जाते. ही सारी संपत्ती वैध मार्गाने मिळवलेली असते हा दावा मान्य केला तरी आमदार व्हायच्या आधी ती त्यांना का कमावता येत नाही याचे उत्तर फुके देऊ शकतील काय? अलीकडे राजकारणात दोन कुटुंबे ही सर्वसामान्य बाब ठरू लागली आहे. मराठवाड्यात तर याचे लोणच पसरले आहे. यावर इतरांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नसले तरी समाजात त्याची चर्चा होणार व त्याचे प्रतिबिंब पडद्यावर उमटणारच. त्यामुळे त्याला रोखा असे म्हणण्यापेक्षा चारित्र्यसंपन्न राहा यासाठी फुकेंनी प्रयत्न करायला काय हरकत आहे? मध्यंतरी फुकेंच्याच पक्षाच्या कल्याणमधील आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या आरोपावरून अजूनही ते कारागृहात आहेत. अशी कृत्ये ही संपूर्ण राजकारणालाच बदनाम करत असतात. मग त्याची दखल चित्रपटांनी घेतली तर तो त्यांचा दोष कसा? राजकारण्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप काही नवे नाहीत. अण्णा हजारेंची अख्खी कारकीर्द यामुळे बहरली. या आरोपामुळे राजीनामा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. युती अथवा महायुतीचा कार्यकाळ लक्षात घेतला तर एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला. यावर फुकेंचे काय म्हणणे आहे? धनंजय मुंडे हे मूळचे भाजपचेच. नंतर ते राष्ट्रवादीत गेले. एका खुनात अप्रत्यक्षपणे गुंतल्याच्या आरोपावरून त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाच्या निमित्ताने बीडमध्ये कसे दहशतीचे साम्राज्य आहे याची वर्णने सर्वत्र प्रकाशित झाली. त्यापासून प्रेरणा घेत कुणी चित्रपट बनवला तर त्यात वाईट काय? यावर हरकत कशी काय घेतली जाऊ शकते?
आजचे राजकारणच मुळात पैशाचे झाले आहे. पैशाला महत्त्व आले ते राजकारण्यांमुळेच. त्याला समाज जबाबदार नाही. मतदारांना पैशाची चटक सुद्धा नेत्यांनीच लावली. एकदा पैसा महत्त्वाचा ठरू लागला की राजकारण करण्याचे सारे संदर्भच बदलून जातात. नीतिमत्ता हद्दपार होते. याचा अनुभव फुकेंनाही आला असेलच. हे पैशाचे स्तोम पडद्यावर प्रकट झाले तर त्यात वावगे ते काय? जे समाजात दिसते त्याचेच प्रतिबिंब साहित्य, चित्रपटातून उमटत असते. यात बदल घडवून आणायचा असेल तर आधी राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करावी लागेल. त्याची तयारी फुके दाखवतील काय? फार दूर कशाला, याच फुकेंनी भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यासोबत प्रचारात संतोष आंबेकर होता. हा नागपुरातला कुख्यात गुंड. सध्या कारागृहात आहे. या गुंडाला सोबत ठेवणे अंगलट येऊ शकते. आपली प्रतिमा खराब करणारे ठरू शकते याची जाणीव तेव्हा फुकेंना झाली नसेल काय? हा एक अपवाद वगळता फुकेंवर कोणत्याही आरोपाचे डाग अजून पडलेले नाहीत. त्यांची काम करण्याची शैलीही लक्षात घेण्यासारखी. तरीही त्यांना अखिल राजकारण्यांच्या प्रतिमाभंजनाची चिंता वाटणे हे जरा अतिच झाले.
ज्या दिवशी फुकेंची ही लक्षवेधी सभागृहात चर्चेला आली त्याच्या चोवीस तास आधी शिवसेनेच्या संजय गायकवाड नामक आमदाराने उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची चित्रफीत झळकली. हे असे गावगुंडासारखे वागूनही राजकारण्यांविषयी चित्रपटात वाईट काहीही नको अशी आशा ते कशी काय बाळगू शकतात? राजकारण्यांच्या भाषेचा स्तर तर अलीकडे मोठ्या प्रमाणात खालावलाय. अगदी रस्त्यावरची भांडणे जशी होतात तशीच आता राजकीय भांडणे दिसू लागली आहेत. भर सभागृहात ‘बाहेर निघ, तुला बघून घेतो’ अशी भाषा मंत्री वापरतात. खुद्द फुकेही याचे समर्थन करू शकणार नाही. मग कशाच्या बळावर ते चित्रपटांवर बंधने आणा असे म्हणतात? राजकारण्यांना पडद्यावर वाईट दाखवणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा कसा ठरू शकतो? फुकेंना एवढीच राजकारण्यांच्या प्रतिमेची चिंता असेल तर त्यांनी स्वत:च एक स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. वाईट वृत्तीच्या लोकांना राजकारणात स्थान नाही अशी भूमिका जाहीरपणे घ्यावी. तशी हिंमत ते दाखवतील का? कारण त्यांच्याच पक्षात सध्या अनेक गणांगाना घेतले जात आहे. नाशिकचे अनेक गुंड नुकतेच पक्षात सामील झाले. त्यावर फुकेंचे म्हणणे काय? आपण ज्या क्षेत्रात आहोत ते सुधारायचे नाही व दुसऱ्या क्षेत्राकडून अपेक्षा बाळगायची हे समर्थनीय कसे ठरू शकेल? या मुद्यावरून इतरांचा गळा दाबण्यापेक्षा स्वत:त बदल करणे केव्हाही चांगले. फुके या मार्गाने जातील अशी अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?