नागपूर : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकापर्यंत पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई, कोकण, विदर्भ असे सर्वत्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे बहुतांश गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला. कधीही न पाहिलेला पाऊस गेल्या दोन दिवसात दिसून आला.
पावसाचे हे सत्र राज्यात पुढील २४ तासांसाठी सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकापर्यंत जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
पावसाचे अलर्ट कुठे..
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा “रेड अलर्ट” देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट क्षेत्रात पावसाचा “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भ मराठवाड्यासाठी पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्याने मोसमी पावसाच्या वाऱ्यांचे प्रवाह आणखी तीव्र होत असून, मुंबईपासून सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट”, तर कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांसाठी “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे.
राज्याची स्थिती काय…
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये, विशेषतः मुंबई, कोकण, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे.
जोर ओसरणार
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरासह राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.