नागपूर : मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला हे जिल्हे वातावरण बदलासाठी अतिशय संवेदनशील आहेत. भविष्यात या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीच्या उच्चांकासोबतच अतिपावसाच्या घटना वाढणार आहेत. जर्मनीतील ‘पोट्सडेम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमॅट चेंज इम्पॅक्ट’ या संशोधन संस्थेने नासाच्या उपग्रहीय साधनांचा वापर करून केलेले ‘भारतातील हवामान प्रभाव चालकांचे मूल्यांकन’ हे संशोधन २०२२ मध्ये प्रकाशित झाले आहे. या आधारे ही माहिती मिळाली.
मध्य महाराष्ट्रातील यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांत २००० च्या तुलनेत २०२० पर्यंत तापमानात वाढ झाली. याच गतीने वाढ होत राहिली तर २०३० पर्यंत तापमान ०.५ ते १.० अंश सेल्सिअस, २०५० पर्यंत १.५ ते २.० अंश सेल्सिअस आणि २०८० पर्यंत ते २.५ ते ३.० अंश सेल्सअस पर्यंत जाईल. तापमानवाढीला आळा घालण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या, तरच ही वाढ ०.७ ते १.४ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित राहील, असे या अभ्यासात म्हटले आहे.
अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्वतीय क्षेत्रात २०५० नंतर तापमान कमी राहील असाही अंदाज यात आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाणदेखील वाढणार आहे. २०३० पर्यंत पावसाच्या वाढीचे प्रमाण कमी राहिले तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास २०५० ते २०८० दरम्यान २० ते ४० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात ही वाढ १० टक्के असेल.
मध्य महाराष्ट्रातील या पाचही जिल्ह्यांत पावसाळय़ाच्या सुरुवातीला पाऊस कमी तर परतीच्या वेळी जास्त राहील, असाही अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत अधिक तापमानवाढीचा अंदाज आहे. त्यासोबतच यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतही २०३० पर्यंत चार ते ३४ दिवस, २०५० पर्यंत १३ ते ६३ दिवस आणि २०८० पर्यंत ३२ ते १२५ उष्ण दिवसांत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- धुळे जिल्ह्याला अधिक फटका.. धुळे जिल्ह्यात २०८० पर्यंत सर्वाधिक उष्ण दिवसांत वाढ होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये २०३०-२०५० आणि २०८० पर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पाऊस अधिक पडला तरीही अतिउष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन कोरडे दिवस वाढतील.
- आठ ते नऊ मॉडेल्सचा आधार.. अभ्यास करण्यासाठी हवामानाच्या सुमारे आठ ते नऊ विविध मॉडेल्सचा आधार घेण्यात आला. आपण जर हरित वायूचे प्रमाण कमी केले तर हवामान बदलाच्या घटना किती कमी होऊ शकतात, याचासुद्धा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याची माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.