‘महानिर्मिती’चे वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (पर्यावरण कक्ष) या पदावरील डॉ. विजय येऊल यांनी पाण्यातील फ्लोराईड अधिषोषण करण्याकरिता वीज केंद्रातील फ्लाय अ‍ॅशमध्ये चिटोसन पद्धतीद्वारे प्रक्रिया करून केलेल्या संशोधनसाठी जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या परिषदेत ‘तरुण वैज्ञानिक’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
जगभरातील वाढते प्रदुषणाचे आव्हान पेलण्याकरता विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत गरजेची आहे. मलेशिया येथे नुकतेच विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे ‘शाश्वत विकास’ या विषयावर आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात भारत, श्रीलंका, मलेशिया या राष्ट्रांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी आपले वेगवेगळे संशोधन सादर केले. महानिर्मितीच्या नागपूर विभागांतर्गत असलेल्या डॉ. येऊल यांनी वीज केंद्रातील फ्लाय अ‍ॅशमध्ये चिटोसन पद्धतीद्वारे प्रक्रिया करून केलेले संशोधन सादर केले. त्याने पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी होत असल्याचे पुढे आले. डॉ. येऊल यांच्या ह्य़ा वैज्ञानिक संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. त्यांना तरुण वैज्ञानिक पुरस्काराने परिषदेत सन्मानित करण्यात आले.
डॉ. येऊल यांच्या संशोधनात्मक कामगिरीबद्दल महानिर्मिती व वीज क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. या यशाचे श्रेय त्यांनी महानिर्मिती व्यवस्थापन, चंद्रपूर वीज केंद्राचे अभियंता राजू बुरडे तसेच अधीक्षक (रसायनशास्त्र) विवेक घोडमारे यांनी दिले आहे.