नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तिरंगा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी. राज यांनी केलेल्या विधानावरून आता चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. काय म्हणाले श्रवण बी. राज पाहूया.

भारतीय संविधान निर्माण करताना नंदलाल बोस यांनी संविधानाचे चित्र काढले होते. त्यात भगवान गौतम बुद्ध व सर्व देवीदेवतांचे चित्र होते. सत्यमेव जयते हे घोषवाक्यही होते. हे नक्षलवाद्यांनी किंवा माओ, स्टॅलीनने दिलेले नाही. त्यामुळे भारतीय संविधान हे सनातन धर्माचे संविधान आहे, भारतीय संविधानाची प्रेरणा सनातन धर्मात आहे, असे मत श्रवण बी. राज यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, २०४७ पर्यंत भारताला मुस्लीम देश बनवणार असे काही संघटना म्हणत आहेत तर नक्षलवादी विचारधारा भारताचे तुकडे करण्याची भाषा करीत आहे. जातींमध्ये भेदभाव करण्याचे काम काही संघटना करत आहेत. भारतीय संविधानावरही वादविवाद होत आहेत. संविधानाची हत्या केली, असा आरोप होत आहे. परंतु, ज्यांनी आणीबाणी आणली त्यांनीच संविधानाची हत्या केली. संविधान हे सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. आज राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाले, राम मंदिर उभारण्यात आले. हे अभाविपसारख्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून होत आहे, असेही ते म्हणाले.

बाबासाहेबांविषयी काय म्हणाले?

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. ते खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे. येथे जात धर्म पाहिला जात नाही. त्यामुळे आज जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर महाकुंभात जाऊन अंघोळ करणारे ते पहिले राहिले असते, असेही श्रवण बी. राज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अराजक स्थिती निर्माण केली जात आहे

सध्या देशभरात वामपंथी विचारधारेचे कार्यकर्ते महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये गैरप्रकार करून त्याठिकाणी अराजक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभाविप कार्यकर्त्यांनी आपली छात्रशक्ती दाखवत हे सर्व देशविरोधी कारस्थाने हाणून पाडावे, असे आवाहन अभाविपचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी. राज यांनी तिरंगा चौक येथे आयोजित सभेत केले.