मजुरांचे स्थलांतर रोखल्याचा फायदा होणार
नागपूर : टाळेबंदीच्या काळात मेट्रोच्या कामावरील मजुरांची नागपूरमध्येच व्यवस्था करणाऱ्या महामेट्रोने प्रकल्पाचे थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे महामेट्रोचे कोमाचे वेळापत्रक मात्र विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.
१८ मार्चपासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने महामेट्रोची शहरातील सर्व कामे थांबली आहेत. यात वर्धा आणि हिंगणा मार्गावरील रेल्वेस्थानकांचा, गड्डीगोदाम आणि वर्धा मार्गावरील चारपदरी उड्डाण पुलाचे तसेच काही भुयारी मार्गाच्या कोमाचा समावेश आहे. एकूण आठ हजार कोटींहून अधिक रकमेच्या मेट्रो प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र टाळेबंदीमुळे ही उद्दिष्टपूर्ती लांबण्याची शक्यता आहे. द्रूतगतीने काम होणाऱ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या नागपूर महामेट्रोच्या प्रकल्पाकडे पाहिले जाते. पुढच्या काळात पावसाळा सुरू झाल्यावर काम पुन्हा बंद करावे लागेल त्यामुळे महामेट्रोने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकल्पाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.
विशेष म्हणजे, महामेट्रोकडे मजूर उपलब्ध आहेत. त्यांच्या विविध कामावर सुमारे तीन हजारावर परप्रांतीय मजूर काम करतात. टाळेबंदीनंतर सर्वत्र मजुरांचे स्थलांतर होत असताना महामेट्रोने मात्र त्यांच्या मजुरांची व्यवस्था नागपुरातच केली. त्यांच्यासाठी निवारागृह तयार करून आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या. याशिवाय आरोग्याची तपासणीही केली. त्यामुळे त्यांना आता काम सुरू करण्याची परवानगी मिळाली तर मजुरांसाठी मेट्रोच्या कंत्राटदारांना इतरत्र भटकावे लागणार नाही.
महामेट्रो व्यवस्थापनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. केंद्र सरकारने टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जारी केलेल्या नियमावलीत पायाभूत सुविधांच्या कामावरील निर्बंध उठवले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नागपूरमध्ये करोना बाधितांची संख्या पन्नासहून अधिक असल्याने सध्या हे शहर ‘रेडझोन’मध्ये आहे. मेट्रोची सर्व कामे शहरातच व विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे त्यांना परवानगी मिळते का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .