नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नागपूरकर देवेंद्र फडणवीस घड्याळ कधीच घालत नाही, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगितली. ते हातात घड्याळ घालत नसेल तरी वेळेच्या बाबतीत ते अगदी चोख आहेत, अशी कबुलीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरकर. तसे ते सर्वच पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधतात, पण नागपूरकर पत्रकारांशी त्यांचे नाते जरा वेगळेच आहे असे म्हणले तर खोटे ठरणार नाही. त्यामुळे नागपूरकर पत्रकारांसोबत हा मनमोकळा संवाद जरा अधिकच रंगतो. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारताना नागपुरातील पत्रकार सुद्धा तेवढ्याच मनमोकळेपणाने प्रश्न विचारतात. दिवाळी मिलन सोहोळयात एका पत्रकाराने त्यांना असाच प्रश्न विचारला. तो देखील घड्याळ संदर्भात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घड्याळ का घालत नाहीत. यावर नागपूरकर मुख्यमंत्री म्हणाले, मी घड्याळी घालत नाही, मी अंगठीही घालत नाही. एक मात्र खरे मी धागा घालतो आणि तो कायमच माझ्या हातात असतो. मात्र, मी घड्याळ घालत नसलो तरीही वेळेच्या बाबतीत मी अगदी वक्तशीर आहे. त्यात मात्र माझ्या घड्याळाचा काटा कुठेही इकडेतिकडे होत नाही. त्यामुळे घड्यात हातात असले काय, किंवा नसले काय, मला काहीही फरक पडत नाही. माझी सर्व कामे वेळच्या वेळेतच होतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या हातातला धागा मात्र कशाचा, हे काही त्यांनी सांगितले नाही. एक मात्र नक्की की ते जेवढे राजकारण समरसून करतात, तेवढेच ते धार्मिक विधिदेखील समरसून करतात. गणेशोत्सव असो वा इतर विधी, त्यात ते नेहमीच मनोभावे पुजाअर्चा करताना दिसून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या हातातला धागाही याच धार्मिक पूजाअर्चेतला. एरवी राजकारण्यांच्या हातात कोट्यावधी रुपयांची घड्याळ दिसून येतात. हाताची पाचही बोटे अंगठ्यांनी भरलेली असतात. अर्थातच या अंगठ्या हिरेमाणकांच्या असतात, हे वेगळे सांगायला नकोच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापैकी कोणत्याही गोष्टीची आवड नाही. ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही, तर आधीपासूनच ते हातात घड्याळ घालत नाही, असे त्यांनी सांगितले. यामागे काही खास कारण नाही, असेही ते म्हणाले. घड्याळ हातात नसले म्हणून काय झाले, पण वेळेनुसार मी चालतो, हे मुख्यमंत्र्यांचे उत्तर मात्र सर्वांना आवडले.
