राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८ टक्के) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.
एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे….५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलीसअधीक्षक, ५ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ४ महापालिका आयुक्त, ३ पोलिस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.