नागपूर: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महानिर्मितीच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखमाफिया चर्चेत आले होते. परंतु नागपुरातील कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राख नि:शुल्क असून उलट शासकीय प्रकल्पासाठी या राखेच्या वाहतुकीसाठी १२५ रुपये खर्च महानिर्मिती देणार आहे.

कोराडी व खापरखेडा औष्णिक वि‌द्युत प्रकल्पातून उपलब्ध होणारी कोळशाची राख ही खसारा, कोराडी, वारेगाव व नांदगाव येथील बंधाऱ्यात पोहचविली जाते. ही राख वीट उद्योगासह विविध ठिकाणच्या विविध भरावासाठी उत्तम पध्दतीने वापरता येते. या राखेला शासकीय पातळीवर कोणतेही मूल्य आकारले जाणार नसून कोणत्याही उद्योजकाला ही राख आता विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता विलास मोटघरे, खापरखेडाचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोराडी औषणिक वीज केंद्रातुन दररोज बारा हजार मेट्रिक टन तर खापरखेडा येथून दररोज सात हजार मेट्रिक टन राख उपलब्ध होते.

या राखेचा उपयोग चांगल्या कारणासाठी व्हावा यादृष्टीने औष्णिक विद्युत प्रकल्प व जिल्हा प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ही राख उपयोगात यावी यासाठी त्या-त्या कार्यालयांना १२५ रूपये प्रति टन वाहतुक खर्च दिला जाईल, हे बैठकीत स्पष्ट केले गेले.

राखेबाबतच्या अधिक माहितीसाठी कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्‌युत केंद्राच्या राख उपयोगिता विभागातील संपर्क अधिकारी यांच्या समवेत संपर्क साधावा. कोराडीतील राखेसाठी कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी यांना ८४११९५७८७२ तर खापरखेडा औष्णिक विद्‌युत केंद्राचे कार्यकारी अभियंता पंकज धारस्कर यांना ९९२३५८५४८१ या भ्रमनध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंधाऱ्यातून कोणत्या उद्योगांना राख मिळणार ?

नागपूर व परिसरातील राख आधारित उद्योग, स्टोन क्वेरी माईन्स, लेआउट भरणा, बांधकाम व्यावसायिक, तसेचं लघुउद्योग (जसे की वीटभट्टी, सिमेंट पाईप, पेवर ब्लॉक उद्योग इत्यादी) यांना संचित राख बंधाऱ्यातून विनामूल्य राख प्रदान केली जाणार आहे. ही राख महानिर्मिती व पर्यावरण विभागाचे नियम, अधिनियम, शर्ती व अटी यांच्याअंतर्गत उपलब्ध करून दिली जाईल असे बैठकीत सांगण्यात आले. कोराडी व खसारा, वारेगाव राख बंधाऱ्यात मुबलक प्रमाणात राख उपलब्ध आहे.