बारावीच्या परीक्षेला दिव्यांग विद्यार्थीही बसले होते. राज्य मंडळाने प्रथमच या विद्यार्थ्यांची स्वतंत्र आकडेवारी काढली असून त्यात परीक्षा देणारे सर्वाधिक अंध मुले आहेत. दिव्यांगांनी या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यांच्यासोबतच मूकबधिर, कर्णबधिर अस्थिव्यंग, स्पास्टिक्स, वाचन अक्षम, स्वमग्न, सेरेब्रल पालसी आणि मतिमंद या प्रवर्गात मोडणाऱ्या ५,६२८ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५,६२० विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण केली. नागपुरातील दिव्यांगांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच हे विद्यार्थीही मेहनत घेण्यात कुठेही कमी नसल्याचे स्पष्ट दिसते.

एकूण १,२७८ अंधांपैकी १,२७७ परीक्षेला बसले होते. त्यापैकी १,१९३ उत्तीर्ण झाले. ७४७ मूकबधिरांपैकी परीक्षेला ७४५ बसले आणि ६४४ उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या ७७ कर्णबधिरांपैकी ६३ उत्तीर्ण झाले. अस्थिव्यंग प्रवर्गात २०१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली.त्यापैकी २०१४ परीक्षेला बसले आणि १,८८० उत्तीर्ण झाले. एकूण ८४ ‘स्पास्टिक्स’ परीक्षेला बसले आणि ८० उत्तीर्ण झाले.

वाचन अक्षम असलेले १,१६२ प्रविष्टांपैकी १,१२४ उत्तीर्ण झाले. स्वमग्न विद्यार्थी फार कमी २५ एवढेच होते. त्यापैकी २३ उत्तीर्ण झाले. सेरेब्रल पालसीचे ११६ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यातून १०९ उत्तीर्ण झाले. मतिमंद प्रवर्गात १२० विद्यार्थ्यांपैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आयएएस व्हायचंय!

शुभम नंदेश्वर या अंध विद्यार्थ्यांने ८१ टक्के गुण प्राप्त केले आहेत. शुभम हिस्लॉप महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला पुढे हिस्लॉप किंवा पुण्याच्या फग्र्यसन महाविद्यालयाचा प्रवेश घेऊन आयएएस व्हायचे आहे. वडील वीरेंद्र यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असून आई बबिता गृहिणी आहेत. शुभमला जन्मत: अंधत्व नव्हते तर डोळ्याच्या नसा जाम होऊन त्याला अंधत्व आले आहे. त्याला संगीत खूप आवडते. त्याचा ‘अमेझिएशन’ नावाचा संगीत समूह आहे. त्याचे तो कार्यक्रमही करतो. तसेच गाण्याला संगीतही देतो.

-शुभम नंदेश्वर,  हिस्लॉप महाविद्यालय

आशीषला बँकिंग क्षेत्राची आवड

आशीष दिनेश पारे या विद्यार्थ्यांने कला शाखेत कुठलीही शिकवणी न लावता ७९.३८ टक्के गुण प्राप्त केले. त्याला बँकिंग क्षेत्रात आवड आहे. ऑडिओ रेकॉर्डिग करून त्याने अभ्यास केला. त्यासाठी मुंबईच्या काही परिचितांचे सहकार्य लाभले. आई सविता आणि वडील दिनेश हातमजुरी करतात. येथे तो मामा गोपाल महाजन यांच्याकडे राहतो. त्याला दोन लहान बहिणी आहेत. त्यातील एक बहीण त्याच्याप्रमाणेच अंध असून तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. आशीषला बँकेत नोकरी हवी आहे. त्याने कोणतेही शिकवणी वर्ग लावले नव्हते. आंबेडकर महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. त्याला भाषण द्यायला आवडते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा तो चाहता आहे.

– आशीष पारे, डॉ. आंबेडकर महाविद्यालय

परवीनची प्रतिकूल परिस्थितीवर मात

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत महापालिकेच्या साने गुरुजी उर्दु प्राथनिक शाळेतील निखत परवीन जीबाईल खान हिने कला शाखेत ७५ टक्के गुण मिळविले आहे. दहावीत याच शाळेत ६२ टक्के गुण घेतले होते. कला शाखेत प्रवेश घेतल्यावर नियमित घरीच अभ्यास केला. अडीच वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरविले आणि त्यानंतर तीन वर्षांपूर्वी आईचे छत्र हरविले. आम्ही तीन बहिणीना काकाने आणि चुलतभावाने सांभाळले. घरची परिस्थिती आर्थिक स्थिती बेताचीच असल्यामुळे शिकवणी वर्ग लावणे शक्य नाही. महापालिकेच्या शाळेत जे शिकविले जात होते त्या आधारावरच अभ्यास केला आणि यश मिळविले आहे. भाऊ नझीम खान आमच्या शिक्षणाकडे लक्ष देत असून यापुढे खूप शिकायची इच्छा असल्याचे निखत म्हणाली.

विमालश्रमातील नंदीनी- शीतलचे यश

शिक्षणावर केवळ प्रस्थापितांचाच हक्क नाही, तर वंचितांनाही शिक्षणाची तेवढीच आस आणि ओढ असते. ही मुले शिक्षणाच्या क्षेत्रात जगावेगळी नाही, पण सामान्यांच्या बरोबरीने किंवा त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवतात. सुभेदार लेआऊट परिसरातील विमलाश्रममधील नंदिनी आणि शीतल या दोन्ही विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ६१ आणि ६९ टक्के गुण मिळवित आम्ही सामान्यांपेक्षा कोणी वेगळे नाही हे दाखवून दिले. लहानपणापासून राम इंगोले यांच्या सान्निध्यात असलेल्या नंदीनी आणि शीतलला दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण होते. बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळतील अपेक्षा होती. मात्र कमी गुण मिळाल्याची खंत या दोन्ही विद्यार्थिनीना आहे. जकाते विद्यालयात असलेल्या या दोघींनी कुठलीही शिकवणी वर्ग न लावता यश मिळविले. दोघींना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे.