वर्धा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल यांनी जाहीर केली आहे. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यातून माजी आमदार रणजित कांबळे, वर्ध्यातून डॉ. उदय मेघे, आर्वीतून अनंत बाबूजी मोहोड, शैलेश अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संधी देण्यात आलेले सुधीर पांगुळ तसेच चारूलता टोकस यांना वगळण्यात आले आहे. शेखर शेंडे किंवा त्यांच्या समर्थकांचा मुळीच विचार न झाल्याची प्रतिक्रिया आहे. जिल्ह्यात आता नवे नेतृत्व देण्याचा विचार झाल्याचे चित्र दिसून येते.

आर्वी मतदारसंघ काँग्रेसनेच लढावा, तो राष्ट्रवादीसाठी सोडू नये म्हणून एकहाती लढा देणाऱ्यात आष्टीचे अनंत बाबूजी मोहोड हे नाव आघाडीवर होते. त्यांचे वडील पक्के काँग्रेसी व जिल्हा परिषद राजकारणात मुरलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांनी डॉ. शरद काळे यांची पाठराखण केली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अनंत मोहोड हे अनेक वर्षानंतर गावी परतत राजकारणात दाखल झालेत. यावर्षी प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत मोहोड यांनी काँग्रेसी झेंडा फडकत रहावा म्हणून प्रयत्न केल्याचे दिसून आले. एक साधा सरळ, निगर्वी व मोठ्या मनाचा असा त्यांचा परिचय काँग्रेस नेते देतात. त्यांची नियुक्ती वरच्या वरिष्ठ पातळीवरून झाल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकाचे मोहोड हे संपादक पण आहेत. आर्वीत अमर काळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट पकडल्यानंतर काँग्रेस आर्वीत रिकामी झाली होती. पण अप्रत्यक्ष ताबा काळे यांचाच राहला. आता मोहोड व अग्रवाल यांच्या प्रदेश नियुक्तीने या भागात काँग्रेसला चेहरा देण्यात आल्याची प्रतिक्रिया आहे. याच भागातील शैलेश अग्रवाल हे समन्वयक म्हणून नियुक्त झाले असून दिल्ली वर्तुळातून ते आल्याचे स्पष्टच आहे. विविध राज्याचे काँग्रेसीचे निवडणूक निरीक्षक म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा

देवळीतले माजी आमदार रणजित कांबळे हे प्रदेश समितीवर येणे अपेक्षितच होते. जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ असे माजी आमदार तेच काँग्रेसमध्ये असल्याने नियुक्ती अटळच. चारूलता टोकस यांना परत संधी नाकारण्यात आली. तसेच वेळेवरील तडजोड म्हणून प्रदेश नियुक्ती मिळालेले सुधीर पांगुळ यांना परत संधी देण्याचे टाळले. डॉ. उदय मेघे हा खऱ्या अर्थाने नवा चेहरा ठरला आहे. उमेदीत सर्व काळ मेघे विद्यापीठाचे स्थानिक सूत्रधार म्हणून कार्यरत राहलेले मेघे हे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुतणे. त्यांचा निस्सीम विश्वास लाभलेल्या डॉ. उदय यांनी काँग्रेस विचारधारेचा आठव करीत काकांची भाजप साथ सोडून काँग्रेस प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसाठी लढण्यास सज्ज झाले. पण संधी लाभली नाही. मात्र आता प्रदेश समितीवर संधी मिळाल्याने मेघे वर्धा मतदारसंघाचा नवा चेहरा म्हणून चर्चेत आले आहे.

खरा मुद्दा काँग्रेस निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंडे गटाचा. गटनेते शेखर शेंडे हे प्रदेश सचिव राहून चुकले. ते स्वतःसाठी किंवा समर्थकास संधी मिळवून देतील अशी चर्चा होती. पण तसे झाले नाही. खुद्द शेंडे म्हणतात की प्रदेश समितीवर मी जाण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच मी एकाही समर्थकाचे नाव त्यासाठी दिले नव्हते. प्रदेश किंवा अन्य समितीवर जाण्यापेक्षा जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अन्यथा पुढे या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष होता कां, अशी विचारण्याची वेळ येईल. मात्र हा विषय जातीय समीकरणातून चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा

प्रथमच तेली समाजास जिल्हा किंवा प्रदेश समितीवर काँग्रेसकडून संधी देण्याचा विचार झालेला नसल्याचे म्हटल्या जाते. तेली – कुणबी वादाचे प्रत्येक राजकीय घडामोडीवर जिल्ह्यात सावट असते. मात्र तेली समाजाचे पारडे भाजपकडे वळविण्यात समाज नेत्यांना यश आल्यानंतर काँग्रेसपासून हा समाज दुरावल्याची उघड चर्चा होत असते. त्यातच आता प्रदेश समितीवर कुणबीबहुल नेत्यांची छाया पसरल्याने जिल्ह्यात नवे पर्व सूरू होणार, असा सूर आहे.