अकोला : गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना बनावट, निकृष्ट दर्जाच्या किंवा वेळेवर न मिळालेल्या बियाण्यांमुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले आहे. याच समस्येच्या मुळावर उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाने ‘महाबीज साथी’ या नावाने एक डिजिटल पोर्टल सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बीज खरेदी प्रक्रियेला पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणार आहे.
शेती हा केवळ व्यवसाय नसून जीवनशैली आहे. या जीवनशैलीची खरी सुरुवात बीज या मूळ घटकापासून होते. योग्य बीजाशिवाय शेतीतून उत्पादन आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत यश मिळवणे अवघड असते. त्यावर उपाय म्हणून ‘महाबीज साथी’ हे पोर्टल राज्यातील शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांना प्रमाणित, दर्जेदार आणि वेळेवर उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते. यामध्ये राज्य व खासगी बीज उत्पादक कंपन्या, त्यांची नोंदणी, बियाण्यांचे प्रकार, त्यांची उपलब्धता, वितरण स्थिती, आणि शासकीय नियामक माहिती आदींचा समावेश आहे. केवळ नोंदणीकृत व तपासणी झालेली बियाण्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध असल्याने शेतकरी बनावट किंवा निकृष्ट बियाण्यांपासून सुरक्षित राहतील. कोणते बीज कुठे, ते किती आणि कधी उपलब्ध होणार, याची माहिती थेट शेतकऱ्याच्या हाती येणार आहे. अपुरा साठा किंवा चुकीची माहितीमुळे होणारे नुकसान टळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील अनेक हगामांमध्ये नकली बियाण्यांमुळे उत्पादनाचे नुकसान झाले. अनेक वेळा बियाण्यांचा पुरवठा अडथळ्यांमुळे वेळेवर होत नाही आणि शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडते. ‘महाबीज साथी’ पोर्टल या समस्या दूर करून शाश्वत आणि योजनाबद्ध शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुढील टप्प्यात या पोर्टलच्या माध्यमातून सीड ट्रेसिंग, कृषी सल्ला, हंगामपूर्व मागणीची नोंद, शेतकऱ्यांचे फीडबॅक या सुविधाही जोडता येतील.
येत्या खरीप हंगामात बियाणे हेसाथी पोर्टलमधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यूआर कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेल स्त्रोत बियाणे कुठून मिळाले. या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होईल. हे बियाणे १०० टक्के शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस.एस.सावरकर यांनी दिली.