नागपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सदर येथील जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यातील अन्यायग्रस्त, पीडित महिलांनी पुढे येवून या जनसुनावणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.
‘राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर पोहचत आहे.
महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, जिल्हा प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मंडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करीत असल्याचे अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.