नागपूर: देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी ) अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजेच राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले. यानुसार आता अभ्यासक्रमात मोठे बदल अपेक्षित आहेत.
यात प्रामुख्याने, शिक्षण संरचनेत बदल, व्यावसायिक शिक्षणाला महत्व आणि अभ्यासक्रमात आधुनिक विषयांचा समावेश असेल. राज्यातील विविध विद्यापीठांनी त्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ही बातमी नव्याने पदवी, पदव्युत्तर आणि व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला आहे. यामध्ये विधि, बी.कॉम., जनसंवाद व लायब्ररी सायन्सच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या ८ जुलै राेजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हाेता, त्याला विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. हा बदल २०२५-२६ या सत्रापासूनच लागू हाेणार आहे. विद्यापीठाने विधि विभागाच्या अभ्यासक्रमात ‘लॉ ऑफ क्राईम्स’, ‘लॉ ऑफ एव्हिडन्स’ आणि ‘सीआरपीसी-बीएनएसएस’ यांसारख्या विषयांच्या नावांमध्ये बदल केला आहे. नवीन नावांनुसारच अभ्यासक्रम अपडेट करण्यात आला आहे.
बी.ए. वाचनालय आणि माहिती विज्ञानच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रामध्ये आता नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत लागू करण्यात आली आहे. हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. बी.ए. जनसंवादच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासाठीही नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजना एनईपीच्या अनुरूप तयार करण्यात आली आहे. हा बदल शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून लागू होईल.
तसेच, पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी ‘ऑनर्स डिग्री’च्या विषय संकेतस्थळामध्येही बदल करण्यात आला आहे. याशिवाय, बी.कॉम. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातदेखील आता अकाऊंटिंग अँड टॅक्सेशन आणि प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या जुन्या विषयांच्या ऐवजी ‘इंट्रोडक्शन टू अकाऊंटिंग’ हा विषय शिकवला जाणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी या बदलांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन परीक्षा विभागाने केले.