अकोला : विरोधकांची नीच प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. त्यांनी डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीत पाडले. ॲड. बाळासाहेब व भैयासाहेब यांच्या पराभवासाठी देखील कुटनीती आखली. प्रस्थापितांनी आंबेडकरी चळवळ गटातटात अडकवली, असा आरोप वंचित आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज केला.

मूर्तिजापूर येथील वंचितचे उमेदवार डॉ. सुजात वाघमारे यांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सुजात आंबेडकरांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

पुढे ते म्हणाले, आता हे विरोधक ॲड. आंबेडकरांच्या जीवावर उठले आहेत. त्यांच्या प्रकृतीवर हात घालत आहेत. निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा सुपडा साफ करायचा आहे, हे लक्षात घ्यावे. विरोधी उमेदवार खोटी माहिती व अपप्रचार करीत आहेत. महाराष्ट्रातील जाणत्या राजांनी आंबेडकरी चळवळी विरोधात षडयंत्र रचले. ते समजून घेतले पाहिजे. आंबेडकरवादी चळवळ प्रस्थापित पक्षांना उभी राहू द्यायची नाही.

हेही वाचा >>> दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी

महाराष्ट्रातील राजकारणात मराठ्यांच्या दोन खानावळी चालतात. त्यामध्ये एक शरद पवारांची, तर दुसरी एकनाथ शिंदे यांची आहे. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस, तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे उपरे ठेवले. या दोन मराठ्यांच्या खानावळीत राजकारण सुरू असते. आंबेडकरवादी आमदार निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर ते दोन्ही एकत्र येतात. कुणाला चालवाचे ते ठरवतात. आपल्या ताटात काहीच पडू देत नाहीत. त्यामुळे हे राजकारण बंद करायचे आहे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >>> खबरदार! आता समाजमाध्यमांवर प्रचार कराल तर….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्थापितांसमोर रांग लावण्यापेक्षा स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण करा. विरोधक नवीन गणिते मांडत आहेत. मतांचे विभाजन करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मविआने लोकसभा निवडणुकीत दलित व मुस्लिमांची फसवेगिरी केली होती. आता त्यांचे गठ्ठा मतदान वंचित आघाडीकडे वळत आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या षडयंत्रात अडकू नका, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. मूर्तिजापूरमध्ये आरोग्याची मोठी समस्या आहे. मूर्तिजापूर व बार्शीटाकळीत चांगले रुग्णालय नाही. रस्ते, पाणी व विजेचे प्रश्न आहेत. शाळा बंद पडत आहेत. उद्योग-व्यवसाय नसल्याने रोजगार निर्मिती नाही. विकासाचा मोठा अनुशेष मूर्तिजापूरमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. हे सर्व चित्र पालटले पाहिजे. हे लक्षात घेऊनच मतदान करा, असे आवाहन देखील सुजात आंबेडकर यांनी केले.