वर्धा : मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री जर भेट देण्यास ठराविक ठिकाणास पसंती देत असतील तर राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारच. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचे भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार हे तीन मुख्य घटक. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतेवेळी मुख्यमंत्रिपद व इतर खाते यावरून बराच विलंब व रुसवे फुगवे झाल्याचा इतिहास राहला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मात्र राज ठाकरे व अन्य पैलूतून छुपी चकमक सुरूच असल्याचे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहून म्हटल्या जाते. नरम गरम स्वरूपातील युतीतील या तीनही पक्षाचे संबंध दिसतात. मात्र काही वेळा समन्वय साधण्याचा व एकमेकांना घेऊन चालण्याचे मोठेपणही दिसत असल्याच्या घडामोडी आहेत.

असा तीनही पक्षातील समन्वय साधण्याच्या घडामोडी विविध ठिकाणी कदाचित घडत असतीलही. पण अश्या घडामोडी अलिकडच्या काळात वर्ध्यात नजरेत भरेल, अश्या घडल्याचे म्हणता येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्धा दौऱ्यावर होते. आपल्या भाषणातून त्यांनी आयोजक पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांच्या आयोजनाची प्रशंसा करतांनाच, पंकजबाबू तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता, ही चांगली बाब असे जाहीर उदगार भाषणातून काढले. त्याचा निकष म्हणजे शिंदे गटाचे रविकांत बालपांडे व अन्य नेत्यांना या कार्यक्रमात मिळालेली सन्मानजनक वागणूक. फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कुरबुर सूरू असतांना शिंदे पाहुणे कसे ! असा प्रश्न राजकीय वर्तुळत उठल्याची चर्चा लोकसत्ताने टिपली होती. खुद्द पालकमंत्री डॉ. भोयर म्हणतात की शिंदे यांना वर्ध्यात निमंत्रण देण्यापूर्वी मी आमचे नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे कुरबुरी वैगेरे बाबी निरर्थक समजाव्या.

आणखी एक आठवण राजकीय वर्तुळत काढल्या जाते. तीन महिन्यापूर्वी देवाभाऊ चषक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन वर्ध्यात झाले होते. तेव्हा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल व शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे या कार्यक्रमात हजर झाले होते. त्यावेळी पण जबाबदारी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडेच होती. त्यांनीच पाहुणे ठरविले. त्यामुळे आयोजनाची जबाबदारी घेऊन त्यांनी पटेल व सरनाईक यांना बोलविले. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानी ही बाब टाकल्याशिवाय भोयर हे पाऊल उचलणे शक्य नाही. तुमच्यावर समन्वय टाकण्याची जबाबदारी पक्षाने दिली काय ? असा प्रश्न गंमतीत विचारल्यावर डॉ. भोयर म्हणतात की या बड्या नेत्यांच्या तुलनेत मी तर सत्तेच्या राजकारणात नवाच. पण सहकार्याचे धोरण ठेवून विकासाचे कार्य करणे सुलभ जाते. वरिष्ठ मार्गदर्शन करतात. तशी पावले मी टाकतो. मित्र पक्ष समन्वयाची पावती देत असतील तर तो त्यांचा मोठेपणा.

याच कार्यक्रमात डॉ. भोयर यांनी एक किस्सा सांगितला. ते व सेनेचे प्रकाश आंबीटकर हे आमदार असतांना विधानसभेत मागच्या बेंचवर एकत्र बसत. तेव्हा आपण मागच्या बेंचवरील पुढील बेंचवर कधी जाणार, अशी गंमतवजा चर्चा करायचो. मात्र फडणवीस यांनी मला व शिंदे यांनी आंबीटकर यांना मंत्रिपदाची संधी देत पुढील बेंचवर आणलेच. असे डॉ. भोयर यांनी म्हणताच शिंदे, आबीटकरसह सर्व व्यासपीठ हास्यात बुडाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीनही पक्षाच्या नेत्यांना वर्ध्यात बोलावण्याची चतुर खेळी डॉ. भोयर यांनी साधली. म्हणून महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय राखण्याचे केंद्र वर्धा ठरत आहे कां, अशी चर्चा झडू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप मेळाव्यास सेवाग्रामात हजर झाले. नेटके आयोजन झाल्याची पावती दिली. जेवणाची तयारी झाली असतांनाच मुख्यमंत्री म्हणाले, चल पंकज, तुझ्याकडेच जेवतो.मला लवकर निघायचंय, असा हा स्नेहतंतू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळावा आटोपल्यानंतर रात्री १० पर्यंत जनता दरबार घेत अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली. हा अन्य जिल्ह्यात दरबार घेण्याचा प्रकार अपवादच. पण पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या पदरात आपसूक पडणारे मोठेपण चर्चेत मात्र आले आहे.