अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तप्त झाले आहे. कार्यकर्त्यांच्या या निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी दिसून येते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना प्रमुख पक्षांकडून अद्यापही उमेदवारांच्या नावाचे पत्ते उघडले नाहीत. इच्छुकांमध्ये चलबिचलता असून शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाराजी नाट्य रंगणार असून बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. यात स्थानिक नेतृत्वाची कस लागणार आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी निवडणूक होत आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगरपालिका आणि मालेगाव नगर पंचायतीची निवडणुकीचे पडघम वाजले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्या सहा दिवसांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अपेक्षित अर्ज दाखल झालेले नाही. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.

या पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर पात्र इच्छुकांनी नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी व वंचित आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची चाचपणी केली. उमेदवारीसाठी अनेक इच्छुक रांगेत आहेत. अनेकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पक्षांतर देखील केले. प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडतांना नेतृत्वाची कसोटी लागत आहे. निवडून कोण येऊ शकतो? याचे सखोल विश्लेषण करून उमेदवारांच्या नावांचा विचार केला जात आहे.

एकाला उमेदवारी जाहीर झाल्यावर इतर इच्छुक नाराज होऊन इतर वाट निवडू शकतात, हा धोका लक्षात घेऊन प्रमुख पक्षांनी सावत्र पवित्रा घेतला. उमेदवार जाहीर झाल्यावर इतर इच्छुकांकडून बंडखोरी किंवा पक्षांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर न करण्याची खबरदारी पक्षांकडून घेण्यात येत आहे. शिवाय समोर कोण प्रभावी उमेदवार येणार, हे देखील पाहिले जात आहे.

या सर्व प्रकारात इच्छुकांचा मात्र जीव टांगणीला लागला. उमेदवारी मिळणार की नाही? या विवंचनेत इच्छुक आहेत. वंचित व राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी याद्या जाहीर होऊन अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू होईल. त्यासोबतच नाराजी, बंडखोरीचे नाट्य देखील रंगात येणार आहे.

स्वबळाचा सूर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी आकारास येणार का? असा प्रश्न असताना बहुतांश ठिकाणी स्वबळाचा सूर निघत आहे. वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाने युती, आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांकडे दिले आहेत. अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या नावावर बहुतांश स्थानिक नेत्यांचा स्वबळाकडेच कल दिसून येताे. येत्या दोन दिवसांत राजकीय समीकरण स्पष्ट होईल.