देवेश गोंडाणे
नागपूर : शहर पोलीस चालक भरती, केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दल अशा परीक्षेमध्ये डमी उमेदवार पुरवल्याप्रकरणी दोन वेळा अटक झालेल्या शिवराणा करियर अकॅडमीचा संचालक सचिन गोमलाडू ऊर्फ राजपूत याला वनविभागाच्या परीक्षेचे केंद्र सोपवल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण परीक्षा केंद्र नियंत्रित करून हा गैरप्रकार करण्यात आला. यासाठी नागपूरच्या केंद्रावर प्रश्न पाठवण्यात आल्याने गैरप्रकाराचे लोण राज्यभर पसरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वनविभागाच्या २,३१८ पदांसाठी पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले असून सोमवारपासून ही परीक्षा सुरू आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार झाल्याने खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीमध्येही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने काही आरोपींना अटक करण्यात आली होती. वनविभाग आणि परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने डमी उमेदवार पुरवण्याप्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीच्या ‘अकॅडमी’ला परीक्षा केंद्र दिले. त्यामुळे केंद्र वाटप करताना टीसीएसने शहनिशा केली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परीक्षा दोन तास उशिरा
नागपूरनजिकच्या वडधामना येथील साई ताज पॉलिटेक्निकच्या केंद्रावर मंगळवारी तांत्रिक गोंधळामुळे दोन तास उशिरा परीक्षा घेण्यात आली. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत परीक्षा देणारे उमेदवार केंद्रावर पोहचले असता त्यांना दीड वाजता परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. मात्र, त्यानंतरही लिंकच उघडत नसल्याने परीक्षेला विलंब झाला. त्यातही काही उमेदवारांच्या संगणकावर आधी तर त्याच्या एक तासाने दुसऱ्या उमेदवाराचा संगणकावर पेपर उघडला. या प्रकारामुळेही परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पेपरफुटीचे नागपूरशी संबंध
छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी शिवराणा करियर अकॅडमीवर छापा टाकला असता पाच जण भ्रमणध्वनीवरून उत्तरे पुरवत होते. जप्त करण्यात आलेल्या भ्रमणध्वनीत उपसरपंच सचिन कारोळ या नावावरून पेपरचे १११ फोटो प्राप्त झाले. हे नागपूरच्या एका परीक्षार्थीने पाठवले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पेपरफुटीचा संबं धनागपूरशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा बोलण्यास नकार
यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय.एल.पी. राव यांच्याशी संपर्क केला व वनविभागाकडून या संपूर्ण प्रकारावर काय कारवाई सुरू आहे, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी उत्तर न देता भ्रमणध्वनी बंद केला.
वन विभागाच्या परीक्षेमध्ये रोज नवीन गैरप्रकार सुरू आहे. आम्ही सुरुवातीलाच तशी शंका उपस्थित केली होती. यासाठी सर्व परीक्षा या टीसीएस कंपनीच्या केंद्रावरच होणे आवश्यक आहेत. लेखापाल पदाचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुन्हा घ्यावी. – राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.