बुलढाणा : खेड्यापाड्यातील निर्जन रस्त्याने जाणाऱ्या महिलांना अडवून त्यांना मारहाण करायची आणि त्यांची मंगळसूत्रे,  मोबाईल हिसकावून पळून जायचे अशी गुन्ह्याची कार्य पद्धती असलेल्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या जवळील सौभाग्य लेणी आणि अन्य मुद्धेमाल जप्त करण्यात आला. आपले सौभाग्य लेणं हस्तगत करण्यात आल्याने या महिलांनी पोलीस दादांचे आभार मानले.

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद व सोनाळा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली. काझी मजहरोद्दीन झुबेरोद्दीन (वय छत्तीस  राहणार राणी पार्क जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा )असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून तब्बल एक लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये  सोन्याचे मणी , दागिने,  एक दुचाकी वाहन, दोन मोबाईल  हस्तगत करण्यात आले आहे शालू धम्मपाल दामोदर (राहणार खेडा खुर्द,तालुका जळगाव जामोद, जिल्हा) या मागील आठ डिसेंबर   २४ रोजी शेतात जात होत्या. आरोपीने त्यांना  अडवून  मारहाण केली व शालू यांच्या  गळ्यातील सोन्याची  पोत व मोबाईल घेऊन आरोपीने पोबारा केला होता. याच आरोपीने अन्य महिलाची सोन्याची पोत जबरीने चोरून नेली होती. यामुळे ग्रामीण भागातील रहिवासी प्रामुख्याने विवाहित महिला भयभीत झाल्या होत्या.

ही बाब लक्षात घेऊन  जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला होता.पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सदर चोरट्याला जेरबंद केले आहे. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, हवालदार दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, चाँद शेख, पोलीस जमादार गोपाल तारुळकर, पुंड आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार राजू आडवे, जमादार ऋषीकेश खंडेराव यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.