नागपूर : मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला. त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले. मुलाने ‘ॲप डाऊनलोड’ करताच खात्यातून ७८ हजार परस्पर काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोना मुदर्ले (३०, इसासनी) यांच्या मोबाईलवर पाच वर्षीय मुलगा गेम खेळत होता.
हेही वाचा >>>नागपूर : मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी
३ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता अनोळखी क्रमांकावरून सायबर गुन्हेगाराचा फोन आला. त्याने मुलाशी संवाद साधला. काही वेळात मुलाला ‘एनी डेस्क ॲप‘ मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. मुलाने ‘ॲप डाऊनलोड’ केला. पुन्हा फोन आल्यानंतर मोना यांनी स्वत: संवाद साधला. ‘तुमच्या मुलाने नवीन ॲप घेतले असून काही लिंक पाठवत असून त्यावर क्लिक करा,’ असे सांगितले. त्यावर मोना यांनी क्लिक करण्यास नकार दिला. बँकेत जाऊन रितसर प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. मात्र, सायबर गुन्हेगाराने काही वेळातच पहिल्याच प्रयत्नात महिलेच्या खात्यातून ७० हजार रुपये लंपास केले. तर काही मिनिटात ८ हजार रुपये परस्पर काढले. पैसे कपात होताच महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली.