प्रेमविवाह केल्यानंतर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुलेश्वरी देवगडे-भोयर (२१) असे मृत पत्नीचे नाव आहे. अमित भोयर (टेकाडी कोळसा खाण, महाजननगर, कन्हान) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. डुलेश्वरी देवगडे (जरीपटका) आणि अमित भोयर यांची गेल्या दोन वर्षांपूर्वी नागपुरातील एका पबमध्ये ओळख झाली होती. काही दिवसांत त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.

हेही वाचा >>> नागपूर : पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत दिसली, संतापलेल्या पतीने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांनीही कुटुंबियांच्या सहमतीने प्रेमविवाह केला. डुलेश्वरी आणि अमितने संसार थाटला. त्यांना ९ महिन्यांची मुलगी आहे. मात्र, डुलेश्वरीला ‘ऑनलाईन शॉपींग’ करण्याची सवय होती. त्यामुळे ती पतीकडून वारंवार पैसे घेत होती. अमित काही दिवसांपूर्वीच जरीपटक्यातील एका कापडाच्या दुकानात कामाला लागला होता. घरात पत्नी डुलेश्वरी आणि आई यांच्यात नेहमी वाद होत होते. त्यामुळे अमित घरातील वादाला कंटाळला होता. आज मंगळवारी सकाळी डुलेश्वरीने सासूला ‘ऑनलाईन शॉपींग’साठी काही पैसे मागितले. मात्र, सासूने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघींमध्ये भांडण झाले. मितने पत्नीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ती पुन्हा वाद घालत असल्याने अमितने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अमितला अटक केली.