नागपूर : मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत एकदा तरी आपल्या चित्रांचे प्रदर्शन लागावे हे प्रत्येक कलावंतांचे स्वप्न असते. त्यासाठी वर्षानुवर्ष त्यांना वाट पाहावी लागते. जेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले त्यावेळी त्या कलावंताची आयुष्यभराची मेहनत, आयुष्यभराची तपश्चर्या फळाला आलेली असते. मात्र, एका क्षणात त्यांच्या या तपश्चर्येला आंदोलनाचे गालबोट लागते, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो, त्यावेळी मात्र तो कलावंत पूर्णपणे खचलेला असतो.
मराठा आंदोलकांनी असेच या कलावंतांचे स्वप्न उधळले आणि हे उधळलेले स्वप्न घेऊन कलावंत परतीच्या मार्गाला लागले. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत चार ते पाच दालने आहेत. त्या प्रत्येक दालनात कलावंतांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते. देश विदेशातील लाखो चित्रकार याठिकाणी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित व्हावे म्हणून आयुष्य वेचतात. वर्षानुवर्ष वाट बघतात.
पाच-पाच, सहा-सहा वर्ष याठिकाणी वाट पाहावी लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनासाठी कलाकृतीना जागा मिळणे म्हणजे कलाकारांचे जीवन सफल होणे असे समीकरण आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या कलाकृतीना प्रदर्शनासाठी दालन मिळावे यासाठी काही मित्रांनी दहा वर्षांपूर्वीच व्यवस्थापनाकडे अर्ज केला होता.
रांगेतील कलाकार पूर्ण होईपर्यंत दहा वर्षे लोटलीत आणि अखेर ऑगस्ट २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शनीची तारीख मिळाली. भारतात सर्वात जास्त कलाप्रेमी आणि चित्रांचे खरेदीदार मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीला भेट देतात. देश विदेशातील कलारसिक करोडोच्या पेंटिंग येथूनच विकत नेतात.
कुठलाच कलावंत रिकाम्या हाताने घरी परत येत नाही. चित्रांची खरी किंमत याच गॅलरीत होते. मात्र, या कलावंतांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. प्रदर्शनाच्या दिवसांमध्येच मराठा आरक्षणासाठी आंदोलकाचे वादळ मुंबईत धडकले. मुंबईतील आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे जहांगीर आर्ट गॅलरीकडे येणाऱ्या कलारसिक आणि चित्र खरीददारांच्या वाटा आपसूकच बंद झाल्यात आणि त्यांच्याऐवजी मराठा आंदोलकांनी गॅलरीत आश्रय घेतला. भावनांचा चित्ररूपी खेळ शांततेत अनुभवणाऱ्या गॅलरीतल्या चार भिंतीना कार्यकर्त्यांच्या घोषणाचा कर्कश्श आवाज ऐकण्याची नामुष्की आली आणि चित्रप्रदर्शनात रसिकांऐवजी कार्यकर्त्यांचा जणू बाजारच भरला. दहा वर्षांपासून केलेली प्रतीक्षा एका क्षणात रसातळाला मिळाली. रंगाचा बेरंग झाला. प्रचंड नुकसान सहन करुन प्रदर्शन अक्षरशः गुंडाळावे लागले. ते खाली स्वप्न गुंडाळून घरी परतले.
मुंबईतील आंदोलकांच्या प्रचंड गर्दीमुळे जहांगीर आर्ट गॅलरीकडे येणाऱ्या कलारसिक आणि चित्र खरीददारांच्या वाटा आपसूकच बंद झाल्यात आणि त्यांच्याऐवजी मराठा आंदोलकांनी गॅलरीत आश्रय घेतला. भावनांचा चित्ररूपी खेळ शांततेत अनुभवणाऱ्या गॅलरीतल्या चार भिंतीना कार्यकर्त्यांच्या घोषणाचा कर्कश्श… pic.twitter.com/MtsPOsH7g3
— LoksattaLive (@LoksattaLive) September 1, 2025
चारही दालनात ते शिरले. आम्ही त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला. खरं तर शनिवार, रविवार आमच्यासाठी खुप महत्त्वाचा असतो. पण आता पर्याय नाही, असे एका हताश झालेल्या कलावंताने सांगितले. आम्ही काही कलाकारांनी मोठ्या मेहनतीनंतर आमचे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित केले होते. मात्र गॅलरीत आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिल्यामुळे आमचे प्रदर्शन अर्धवट बंद करावे लागले. यामुळे आम्हाला व आमच्या कलाकृतींना योग्य तो प्रतिसाद व संधी मिळू शकली नाही. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन लावणे ही प्रत्येक कलाकाराची मोठी संधी असते. त्यासाठी अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागते. परंतु आमच्या बाबतीत अचानक झालेल्या या प्रसंगामुळे आम्हाला अन्यायकारक नुकसान सोसावे लागले आहे. म्हणून आपण कृपया आमच्या भावनांचा विचार करून, आम्हाला पुन्हा एकदा गॅलरीत आमचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्याची संधी द्यावी, अशी मागणी या कलावंतांनी केली आहे.