नागपूर : मराठीबद्दल निष्ठा असावीच यात दुमत असण्याचे कारण नाही, पण मराठी बोलता येत नाही म्हणून कानफटात मारण्याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. मराठी भाषेसाठी हा उपाय होऊच शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने धरमपेठेतील वनामती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे उपस्थित होते. मराठी संस्कृती जोपासणाऱ्यांसोबत मी काम करत आहे. डॉ. सामंत पुढे म्हणाले, लेखकांनी सरकारवर केलेली टीका ही टीका नाही, तर सरकारला दिलेली दिशा आहे. मात्र, सकाळ उठतापासून सरकारला शिवीगाळ करणाऱ्यांना साहित्यिकांनी समज द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठी, हिंदी किंवा कोणतीही भाषा सक्तीची करा, या राजकारणात मला जायचे नाही, मात्र मराठी भाषेवर राजकारण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणे योग्य आहे काय, असा सवाल त्यांनी केला. भाषेच्या सक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी आधी किमान पाच वर्षे अभ्यास करावा, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले.

पाटील आणि सामंत समोरासमोर..

मराठीची सक्ती आणि भक्ती दोन्ही अनिवार्य आहे. मराठी माणसाची मान ताठ करण्यासाठी मराठीशिवाय पर्याय नाही. आपल्याकडचे अधिकारी इतर राज्यात जातात तेव्हा तेथील भाषा शिकतात व मुलांनाही शिकवितात. मग महाराष्ट्रात येणाऱ्या अमराठी अधिकाऱ्यांना मराठी शिकण्यासाठी पोटात मुरडा का उठतो, असे मत लेखक विश्वास पाटील यांनी मांडले. त्यावर येथे येणाऱ्या प्रत्येक अमराठींनी मराठी शिकावे, पण येत नाही म्हणून त्यांच्या कानाखाली मारणे योग्य आहे का, असा उलट सवाल राज्याचे मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केला.