बुलढाणा : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने मिळालेल्या धक्क्यातून  सावरलेली काँग्रेस अखेर आज रस्त्यावर उतरली.प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनुसार आज सोमवारी,राज्यभरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एल्गार मोर्चे काढण्यात आले.  बुलढाण्यात काढण्यात आलेल्या मोर्चा निमित्त काँग्रेसमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.

महायुती सरकारकडून निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वारंवार सांगण्यात आले. जाहीरनाम्यात सातबारा कोरा करु असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्याल्यावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. सोयाबीन, कापूस, तुरीला हमीभाव नाही. नाफेड अंतर्गत सुरु असलेली खरेदी सरकार जाणीवपूर्वक संथ गतीने करत आहे. थकलेला पीक विमा, सिंचन अनुदान व यासह शेतकऱ्यांच्या इतर  मागण्यांसाठी  एल्गार मोर्चा काढण्यात आला. जयस्तंभ  चौकातील गांधी भवन येथून दुपारी सव्वा दोनच्या सुमारास या मोर्च्याला प्रारंभ झाला. जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, श्याम उमाळकर, लक्ष्मण  घुमरे, रशीदखान जमादार, अडव्होकेट विजय सावळे, चित्रांगण खंडारे, हरीश रावळ, दत्ता काकस, सत्येद्र भुसारी, महिला आघाडी अध्यक्ष मंगला पाटील , सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, अंबादास बाठे

श्लोकानंद डांगे, सेवादलचे प्रकाश धुमाळ, एनएसयुआय चे शैलेश खेडकर यासह  काँग्रेस, महिला, अनुसूचित जाती, कामगार, इंटक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्च्यात बहुसंख्येने सहभागी झाले. गांधीभवन येथून निघालेला मोर्चा जिल्हा परिषद मार्ग, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यलयावर येऊन धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर जिल्हाध्यक्ष बोन्द्रे यांनी मोर्च्याला संबोधित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 कर्जमाफीचे काय? : राहुल  बोंद्रे

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केंद्र व राज्य सरकारवर  आसूड ओढले. शेतकऱ्यांच्या  ज्वलंत प्रश्नाकडे राज्य सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रातील महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखी अनेक आश्वासने दिली आहेत, मात्र त्यांच्या पुर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. तसेच शेतमालाचे हमीभाव, थकीत, भावांतर योजना पीकविमा यासह इतर अनेक प्रश्न कायम आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले. कुंभकर्णी झोपेतून सरकारला जागे करण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात  आला असे ते म्हणाले.