लोकसत्ता टीम
बुलढाणा: समृद्धी महामार्गाववरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांच्या मृतदेहावर रविवारी सकाळी बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ‘डीएनए’ चाचणीचे काम सुरू असले तरी ते जिकिरीचे आहे. यामुळे बहुतेक नातेवाईकांच्या सहमतीने सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज सकाळपासून जिल्ह्यात प्रामुख्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात महाजन तळ ठोकून आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. संध्याकाळी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना ते म्हणाले की, ‘फॉरेन्सिक टीम’ने सलग २४ तास काम केले तरी ‘डीएनए’चा अहवाल यायला ५ दिवस लागतील. मात्र जळालेले मृतदेह एवढे दिवस ठेवता येणार नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन आहे.
सर्व मृतदेह बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत २५ मृतांपैकी २० जणांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले असून उर्वरित रात्री उशिरापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मृतदेह जळाल्यामुळे शवगृहात त्यांना ३ दिवसापेक्षा अधिक वेळ ठेवता येणार नाही, असेही ना. महाजन यांनी सांगितले. यावेळी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले उपस्थित होत्या.