नागपूर : बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर ग्रामीण भागात ‌वाळू माफियांचा हैदोस सुरु असून कोट्यवधीची वाळू तस्करी केल्या जात आहे. ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांवर अंकुश ठेवत गेल्या सव्वादोन वर्षांत १४५५ वाळू तस्करांना अटक केली असून  वाळूसह १६२ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर ग्रामीणमध्ये वाळू माफियांचे मोठे प्रस्थ असून मोठ्या धडक्यात वाळू तस्करी सुरु आहे. नागपूर शहरातील काही वाळू तस्करांनी ग्रामीण भागातही आपले अड्डे निर्माण केले आहे. तस्करी केलेली वाळू एका ठिकाणी जमा करण्यात येते. त्यानंतर वाळूचा काळाबाजार करुन कोट्यवधीची उलाढाल करण्यात येत आहे. २०२३ मध्ये पोलिसांनी वाळू तस्करीचे १९४ गुन्हे दाखल करुन ३७२ आरोपींना अटक केली. या आरोपींकडून २०८ वाहने आणि इतर साहित्य मिळून ३० कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर २०२४ मध्ये ३४१ प्रकरणांत ७१५ वाळू तस्करांना अटक करण्यात आली असून ४०५ वाहनांसह ७९ कोटी ५ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वर्षे २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यांच्या कालावधीत ग्रामिण पोलिसांनी १८७ गुन्हे दाखल केले असून ३६८ वाळू तस्करांना अटक केली. तसेच वाळूंची तस्करी करणारे २०८ वाहने जप्त केले असून एकुण ५३ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आले. ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांची शेकडो वाहने जप्त केल्यामुळे वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी विशेष अभियान सुरु केले आहे.

वाळू माफियांना राजकीय पाठबळ

सत्ताधारी व विरोधी गटातील नेत्यांच्या आशिर्वादाने वाळू माफिया तस्करीचे जाळे वाढवत आहेत. एका दिवसाच्या वाळू वाहतुकीच्या परवान्याचा गैरवापर करून आठवडाभर वाळू वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात महसुली नुकसान होत आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे वाळू माफियांसोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचेही काही प्रकरणांतून समोर आले आहे.

वाळू तस्करी आणि तस्करांवर ग्रामीण पोलिसांनी अंकुश ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विक्रमी कारवाई पोलिसांनी केली आहे. वाळू माफियांवर नियमित कारवाई केल्या जाईल. – रमेश धुमाळ (अप्पर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण पोलीस विभाग)