अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अमरावती जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार लाभार्थ्यांपैकी तब्बल २५ हजारावर जणी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता या अपात्र ठरलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. योजना सुरू झाल्यानंतर आर्थिक निकष, मालमत्तेची माहिती व इतर अटींच्या आधारावर या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे २४४ महिलांनी स्वतःहून लाभ नाकारत माघार घेतली आहे.
अमरावती जिल्ह्यातील ७ लाख २० हजार ६०३ महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ६ लाख ९८ हजार ५३६ महिला पात्र ठरल्या. मात्र निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली. त्यात आतापर्यंत २५ हजार ६७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. २४४ महिलांनी स्वतःहून माघार घेतली आहे. अपात्रतेच्या कारणांमध्ये वार्षिक उत्पन्न अधिक असणे, स्वतः किंवा घरातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असणे, नोकरीत असणे, दस्तावेजांची अपुरेपणा, खोटी माहिती देणे असे काही प्रकार पुढे आले आहे. तसेच ५ हजार ९४२ महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे सुद्धा उघडकीस आले असून, योजनेच्या अटीनुसार अशा महिलांना लाभ देणे थांबवण्यात आले आहे. संबंधित माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळवून कारवाई करण्यात आली आहे.
अपात्र महिलांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्वतःहून अर्ज करून योजनेत आपलं नाव काढून घेणाऱ्या महिला सुरुवातीला मिळालेले पैसे परत करतील. मात्र सुरुवातीला काही हप्ते लाभ घेतलेल्या आणि आता सरकारने निकषात अपात्र ठरलेल्या महिला लाभार्थी पैसे परत करणार का? हा मोठा प्रश्न आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला काही महिने महिलांना दिलेले पैसे परत घेतले नाहीत, तर हा भुर्दंड सर्वसामान्यांवर पडणार आहे. हे कायद्याला धरून आहे का? असे सवाल केले जात आहेत.
राज्य सरकारने निवडणूक काळात महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये प्रतिमहिना देण्याचे वचन दिले होते. मात्र आजतागायत बहिणींना १५०० रुपयांहून अधिक रक्कम मिळालेली नाही. त्यामुळेही महिलांमध्ये नाराजी वाढली आहे.